शिवतिर्थावर पुन्हा एकदा हजारो मराठा एकवटले!
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आरक्षणयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज ( 29 रोजी) कँडल मार्च काढण्यात आला. शिवतिर्थावर हातात कँडल घेऊन शिस्तबद्ध पध्दतीने पुन्हा एकदा हजारो मराठा सहभागी झाले होते.
राज्य सरकार ने मराठा आरक्षणासाठी दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपल्यानंतर आरक्षणयोध्दा मनोज जरांगे पाटील दुसऱ्या टप्प्यात पुन्हा आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आता माघार नाही एक तरह आरक्षण पदरात पाडीन नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आज रविवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या प्रकृती खालावली. त्यांच्या प्रकृतीची काळजी महाराष्ट्रातील तमाम जनतेला लागली आहे. त्यांच्या समर्थनार्थ विविध प्रकारचे आंदोलन होत आहेत. रविवारी रात्री बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. यात महिलांची लक्षणीय उपस्थिति होती. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला.