स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे
By MahaTimes ऑनलाइन |
शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इतर साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरू लागले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयासह इतर काही खाजगी रुग्णालयांमध्ये बीड शहरात डेंग्यूचे 100 रुग्ण उपचार घेत आहेत.यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरात सर्व प्रभागांसह लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे.
बीड शहरात सध्या सर्वत्र अस्वच्छता आहे. ठिकठिकाणी नाल्या साचलेल्या आहेत. मोठे नाले गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. जागोजाग कचऱ्यांचे ढिगारे पडलेले आहेत. नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून केलेल्या सिमेंट रस्त्यांना देखील काही ठिकाणी एका बाजूने कचरा डेपोचे स्वरूप आलेले आहे. काही भागांमध्ये रस्त्यांवर देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तिथूनच डासांची पैदास होऊ लागली आहे. कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावरील घाण पाणी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.
प्रत्येक घराघरात एक ते दोन रुग्ण दररोज आढळत आहेत. जिल्हा रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या बीड शहरात डेंग्यूचे 100 रुग्णांवर डेंगूच्या आजारावरील उपचार सुरू आहेत. याची दखल नगरपालिकेने तातडीने घ्यावी आणि पूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे. त्याचबरोबर बीड शहरातील नागरिकांनीही आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून स्वतःच्या आणि इतरांच्या ही आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन भाजप नेते यांनी केले आहे.