मराठा समाज आक्रमक; ‘गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या’!
जिल्ह्यात ठिकठिकाणी रॅली काढुन आणि आंदोलने; राज्य सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला शुक्रवारी गेवराई बंद पाळून उत्स्फुर्त पाठिंबा दिला. त्यानंतर रात्री अंतरवाली (ता. अंबड) येथे आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे समाज बांधवांत संतापाची लाट उसळली आहे. बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असुन संतप्त आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतुक रोखली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी रॅली काढुन आणि आंदोलने करून राज्य सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या बंदमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होत सर्वांनीच अंतरवली येथील घटनेचा निषेध नोंदविला.

जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर अंबड तालुक्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनादरम्यान मनोज यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. बीड जिल्हा वकील संघाने आजच्या बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवुन पाठिंबा दिला. वकील संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या आंदोलनात सहभागी होवुन अंतरवली येथील घटनेचा निषेध नोंदविला. सदर घटनेची चोकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
बीड- पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ हटवा अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्यासह आंदोलकांनी केली.
माजलगावात व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजलगाव : जालना येथे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठी चार्ज केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. दरम्यान पोलीस अत्याचार व राज्य सरकारच्या निषेधार्थ शनिवारी माजलगावात मराठे रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी दिलेल्या बंदच्या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री गेवराईत येवून माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार गेवराईत आज दुपारी हजारो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून धुळे- सोलापुर महामार्ग रोखला. यावेळी आंदोलकांनी आक्रमकपणे भुमिका मांडली असुन राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री गेवराईत येवुन मराठा समाजबांधवांची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगीतले.
