तीनशे गाड्यांचा ताफा; सर्वसाधारण सभेला मोठ्या सभेचे स्वरूप, ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गेली चाळीस वर्षे आपण सक्रिय राजकारणामध्ये आहोत, स्व.काकूंनी दिलेला प्रत्येक धडा आजही गिरवत आहोत. विकास आणि समाजकारण या माध्यमातूनच जनतेशी जोडले गेले आहोत. सध्याची राजकीय परिस्थिती फार विचित्र आहे. धुराळा आणि फुफुटा प्रचंड उडालाय, त्याला शांत होवू द्या, नंतर निर्णय घेवू. राजकारणामध्ये संयम महत्वाचा असतो, मी अपयशाने कधीच खचलो नाही आणि सत्तेने हुरळून गेलो नाही, काळजी करू नका मी खंबीरपणे उभा आहे असे म्हणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांंना आश्वस्त केले.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या श्री गजानन नागरी सहकारी बँक, आदर्श शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था म.बीड, खरेदी विक्री संघ आणि श्री गजानन सहकारी सुतगिरणी या चार संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. नाना महाराज ढेकणमोहकर, जगदीश काळे, रोहित क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, दिनकर कदम, विलास बडगे, नानासाहेब काकडे, गणपत डोईफोडे, अरुण डाके, गंगाधर घुमरे, तानाजी कदम, अरुण बोंगाणे, शिवाजीराव जाधव, बाबुशेठ लोढा, नितीन लोढा, मुखीद लाला, किशोर पिंगळे, सुग्रीव रसाळ, अच्युत मोरे, माधवराव मोराळे, सर्जेराव खटाने, अर्जुन बहिरवाळ, सखाराम मस्के, उषाताई विजय सरवदे, विलास विधाते , मुखीद लाला, दिनेश पवार, पांडुरंग भूमकर, राजाभाऊ शेळके, दिलीप आहेर, अच्युत शेळके, बालाप्रसाद जाजू, देविदास चरखा, संदीप डावकर, नवनाथ घोडके, संपत गुंदेकर, महारुद्र वाघ, राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ईट येथील सूत गिरणीवर आयोजित सर्वसाधारण सभेला मोठ्या सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सहा ते सात हजार निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपण स्व.काकूंनी दाखवलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल करत राहिलो. राजकारणामध्ये अनेक यश-अपयश आपण पचवले आहेत. यशाने कधी हुरळून गेलो नाहीत आणि अपयशाने कधी खचूनही गेलो नाहीत. काळजी करून नका मी खंबीरपणे उभा आहे. आपण आपलं कर्तव्य पार पाडत राहायचं. सत्तेच्या माध्यमातून बीड शहर आणि बीड मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. कुटुंब प्रमुख म्हणून दोन्ही भावाच्या मुलांना राजकारणात सक्रिय केलं पण प्रवाहाच्या दिशेने त्यांनी वाटा निवडल्या हा त्यांचा निर्णय आहे, पण रक्ताच्या नात्यापेक्षा तुमचं माझ नात घट्ट आहे, तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला शक्ती देतो, बीड जिल्हा क्रांतिकारक व अत्यंत प्रभावशाली विचारांचा, आचारांचा व लोकांचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला जेव्हा गरज भासली तेव्हा तेव्हा बीड जिल्ह्याने नेतृत्व उभे केले आहे.
पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकारणात गरुड झेप घेऊन दाखवू
माझ्यावर विश्वास ठेवा मी जो निर्णय घेईल तो तुमच्या हिताचा असेल आज माझ्याबरोबर या काळात जो उभा राहील त्याच्यासाठीच माझ्या उद्याच्या चांगल्या काळात सुगीचे दिवस असतील याची खात्री बाळगा कोणताही देव एका नवसाने पावत नाही अथवा कोणते नेतृत्व एखाद्या पराभवाने संपत नाही अशावेळी घाई करून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळेची व संधीची वाट पाहण्यातच खर्या नेतृत्वाचे कौशल्य आहे त्यामुळे आपण सर्वांच्या सहमतीने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ व पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकारणात गरुड झेप काय असते हे सगळ्यांना दाखवून देऊ त्याची साक्ष देण्यासाठी आपण ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात हीच गोष्ट माझ्यासाठी व आपल्या राजकारणासाठी धैर्य वाढवणारी आहे. अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्या इतके चढ-उतार यश व अपयश अन्य कोणीही पाहिले नाही मी कधीही यशाने हुरळून गेलो नाही आणि अपयशाने खचलो नाही, त्यामुळे कोणी चुकीचे निर्णय घेऊन आपल्याला बदनाम करीत असेल तर अशा लोकांनाही आपण माफ करणार नाही, हीच या दिवशीची भूमिका असेल असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास विधाते यांनी केले तर या प्रसंगी रोहित क्षीरसागर, गंगाधर घुमरे, सुधाकर मिसाळ, मुखीद लाला यांचीही भाषणे झाली.
टायगर अभि जिंदा है – विधाते
नेत्याच्या पाठीशी एकनिष्ठ कार्यकर्ता असेल तर तो नेता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहू शकतो, जयदत्त आण्णा हे असे नेतृत्व आहे की त्यांनी 40 वर्षात 20 वर्ष मंत्रिपद तर 20 वर्ष आमदार म्हणून काम केले, आजची उपस्थिती त्याची साक्ष आहे कारण आपल्यासाठी जयदत्त अण्णा हाच एक पक्ष आहे सत्तेबरोबर कुणी गेले हे ओरडून सांगण्याची गरज नाही. त्यांचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अण्णांनी अनेक चढउतार पाहिले आहेत सत्ता कशी उपयोगी पडते हे अण्णांनी दाखवून दिले आहे असे सक्षम नेतृत्व सोडून आपण सत्तेचा उन्नत जवळ करायचा का? असा सवाल करत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.