मुंबईत डॉ.योगेश क्षीरसागरांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : दिवंगत नेत्या, माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचा मला सहवास लाभला. ग्रामीण भागातून आलेल्या केशरकाकूंनी जिल्ह्याच्या विकासात योगदान देऊन कार्याचा अविस्मरणीय ठसा उमटविला. बीड शहर आणि जिल्ह्याच्या विकासात डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे योगदान आहे. त्यांचे वारसदार असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने नवे नेतृत्व उदयास आले असून त्यांना बळ देणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बीड विधानसभेचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.दिपा क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर, डॉ.पूजा क्षीरसागर यांचा बुधवारी (दि.23) दुपारी 3 वाजता प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार हे बोलत होते. व्यासपीठावर कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, माजी आमदार संजय दौंड, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, ज्येष्ठ नेते राजकिशोर उर्फ पापा मोदी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, क्षीरसागर कुटुंबियांचे विकासात योगदान आहे. डॉ.भारतभूषण हे अनेकदा बीड शहरासह ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडे येत असत. कर्तृत्व सिद्ध केल्यानेच नगरपालिकेवर त्यांचे वर्चस्व राहिले. आगामी काळात बीड शहर आणि जिल्ह्याला भरीव निधी देणार आहे. क्षीरसागर दाम्पत्य जनतेला वैद्यकीय सेवा देत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्यांच्या अंगी असलेने कर्तृत्व, नेतृत्व आणि व्हीजन लक्षात घेऊन त्यांना संधी देणार आहे. क्षीरसागर कुटुंबियांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. सध्या बीडसह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. कसल्याही प्रकारचे संकट आले तरी राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी असल्याचे कृतीतून दाखवून देऊ. मदतीसाठी तसूभरही कमी पडणार नसल्याची ग्वाही डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सर्वच पदाधिकार्यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासोबत मजबुतीने उभे रहावे. त्यांना सर्वांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन केले.
बीड मतदारसंघासाठी योग्य व्यक्ती मिळाला-धनंजय मुंडे
डॉ.योगेश क्षीरसागर यांचा हा पक्ष प्रवेश नसून माझ्या दृष्टीने घरवापसीच आहे. बीडमध्ये 27 तारखेला होत असलेली भव्य सभा आता योगेश क्षीरसागरांमुळे अतिभव्य होणार आहे. त्यांचा बीडमधील सभेपूर्वी प्रवेश झाला असून नियोजनाच्या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. योगेश यांच्या रूपाने आम्हाला बीड मतदारसंघासाठी आता योग्य व्यक्ती मिळाला आहे. अजित पवारांकडे काहीही मागायची गरज पडत नाही, ते नेतृत्वाला बरोबर बळ देतात. आपण देखील योगेश क्षीरसागरांना लागेल ती ताकद देणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. बीडला होणारी सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
योगेश क्षीरसागरांनी प्रवेशाचा टायमिंग साधला-सुनील तटकरे
स्व.केशरकाकूंचे राजकारण आम्ही पाहिले आहे. त्यांना मी आदर्श मानतो. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राजकारण करताना कर्तृत्वान नेतृत्वाला बळ दिले जाते. यापूर्वी अजित पवार, धनंजय मुंडे यांनी बीडच्या विकासाला गती दिलेली असून आता मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी योगदान दिले जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तरुण वयातील डॉ.योगेश क्षीरसागरांनी सुज्ञपणाचा विचार करून राजकीय प्रवेशाचा योग्य टाइमिंग साधल्याचे त्यांनी कौतुक केले. प्रवेशासाठी असलेला उत्साह कायम ठेवून बीडमध्ये होणारी सभा रेकॉर्डब्रेक करावी, असे आवाहन श्री.तटकरे यांनी केले.
यांचा झाला पक्ष प्रवेश
व्यासपीठावर प्रातनिधिक स्वरूपात रा.काँ.चे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष पाशा शेख, आ.संदीप क्षीरसागर गटाचे नगरसेवक रमेश चव्हाण, बिभिषण लांगडे यांचा पक्ष प्रवेश झाला. तसेच, दूध संघाचे व्हाईस चेअरमन लालासाहेब चौरे, पं.स.चे माजी सभापती काकासाहेब जोगदंड, माजी उपसभापती अरूण लांडे, जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र राऊत, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल झोडगे, माजी नगरसेवक अमोल पौळ, बाळासाहेब आंबेकर, बाळासाहेब जाधव, नसीर अन्सारी, सद्दाम मोमीन, खलील शेख, युनूस मुजीब, विनोद मुळूक, रविंद्र कदम, विकास जोगदंड, प्रेम चांदणे, संतोष गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, बाबुराव दुधाळ, रंजीत बनसोडे, भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, नरसिंग नाईकवाडे, शुभम धुत, मुन्ना इनामदार, सय्यद इलियास, सादेक जमा, जलील खानपठाण, इकबाक शेख यांच्यासह अनेक गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन यांचा प्रवेश झाला.