वृद्ध पिता यादवराव पाटील यांची पोलीस अधीक्षकांना विनंती ; त्या विधवेला न्याय द्यावा – माजी खासदार खतगावकर
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आष्टी येथील माझ्या विधवा मुलीच्या मालकी व ताब्यात असलेल्या घरावर तिचा दीर आणि त्याचा मित्र यांनी अनधिकृत ताबा घेतला आहे. एवढेच नव्हे तर ते दोघेही माझ्या विधवा मुलीवर वाईट नजर ठेवून असल्याने तिची अब्रू आणि तिची संपत्तीला या दोघांपासून धोका आहे. तसेच त्यांना साथ देणाऱ्या इतर अकरा जणांपासून तिला वाचवावे आणि संरक्षण द्यावे. यासाठी संबंधितावर आष्टी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार तात्काळ अटक करावी अशी आर्त मागणी वयोवृद्ध पीडित विधवेचे वडील यादवराव पाटील यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिलेल्या निवेदनात पीडित विधवेचे वडील यादवराव पाटील यांनी म्हटले आहे की, मी देगलूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझी मुलगी आष्टी येथील विवेक उरणे यांना दिली होती. विवेक उरणे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा एक मुलगी आहे. माझे जावई विवेक उरणे यांचे देखील 14 एप्रिल 2021 रोजी कोरोना महामारीने निधन झाले. जावयाच्या निधनानंतर माझ्या मुलीस व नातीस राहण्यासाठी तिच्या सासू, दिर आणि सावत्र मुलांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आष्टी यांच्या न्यायालयात तडजोड पत्रा आधारे राहण्यासाठी घर वाटप करून दिलेले आहे. त्या घरावर न्यायालयाच्या डिक्री आधारे माझी मुलगी आणि नात यांच्या नावाची नोंद नगरपंचायत आष्टी तसेच भूमि अभिलेख कार्यालय आष्टी कार्यालयात पीटीआर रेकॉर्डला व पी आर कार्ड रेकॉर्ड झालेले आहे.
सदरील घर हे माझी विधवा मुलगी हिच्या ताब्यात असताना तिच्या दिराच्या तसेच तिच्या सावत्र मुलांच्या आणि इतरांच्या पाठबळावर त्या घरामध्ये त्याच्या मित्राने बेकायदेशीरपणे माझ्या मुलीच्या नावे मालकी व ताब्यात असलेल्या घराचा ताबा बंदुकीचा धाक दाखवत घेतला आहे. यासंदर्भात आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार करूनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. म्हणून माझ्या विधवा मुलीस तिच्या हक्काचे घर हक्काच्या घरावर बेकायदेशीर रित्या त्याच्या मित्रानी केलेला ताबा सोडवून घर माझ्या विधवा मुलीच्या नावे ताब्यात द्यावे यासाठी योग्य तो आदेश पोलीस निरीक्षक आष्टी यांना द्यावा एवढेच नव्हे तर माझ्या विधवा मुलीचा दीर त्याचा मुलगा आणि मित्र हे वाईट नजर ठेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून माझ्या मुलीची इज्जत धोक्यामध्ये आहे तेव्हा आष्टी पोलीस स्टेशनला या सर्वांवर दाखल झालेल्या गुन्हामध्ये पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करून आरोपींना अटक करावी आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा. अशी आर्त मागणी पोलीस अधीक्षक बीड यांना पीडित विधवा मुलीच्या वडिलांनी केले आहे.
त्या विधवेला न्याय द्यावा
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील यादवराव पाटील यांच्या मुलीचा विवाह आष्टी येथील विवेक उरणे समवेत झाला होता. तिच्या पतीचे कोरोना महामारीत निधन झाले. निधनानंतर तिच्या मालकी हक्काच्या घरावर दीर सावत्र मुले आणि इतर बेकादेशीर त्या घराचा ताबा घेतलेला आहे. त्याचबरोबर सदरील विधवा महिला एकटीच असल्याने तिच्यावर वाईट नजर ठेवून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारामध्ये पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता न्याय द्यावा, पोलीस अधीक्षक म्हणून आपण या प्रकरणात विशेष लक्ष घालून दोषीविरुद्ध कारवाई करून आरोपींना अटक करावी.
भास्करराव पाटील खतगावकर,
माजी खासदार, नांदेड
अन्याय करणाऱ्यावर कारवाई होईल – पोलीस अधीक्षक ठाकूर
कागदपत्रानुसार जर विधवा मुलीच्या नावे आपले घर आहे आणि त्याच घरावर जर बेकायदेशीर ताबा कोणी घेतला असेल त्या सर्व दोषीविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. आरोपींना पोलीस पाठीशी घालणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका घेतली.