– खा. प्रितमताई मुंडे यांची पत्रकार परिषद
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला. खासदार म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व करताना केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे हाती घेऊन आपला जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत आणून दाखवल्याचा दावा खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केला.
संघर्षयोद्धा जिल्हा भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णी, सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, अजय धोंडे. डॉ. लक्ष्मण जाधव, सलीम जहागीर, विक्रांत हाजारी, अजय सवाई, जगदीश गुरखूदे, चंद्रकांत फड आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या 9 वर्षाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाल्या की गेल्या ९ वर्षांत देशाला दहशतवादापासून मुक्त करणाऱ्या मोदी सरकारने जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले. ९ वर्षांत गोरगरीब, वंचित वर्गाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे महत्वाचे काम केले. गरीब कल्याण योजनेद्वारे ८० कोटी जनतेला मोफत अन्न धान्य दिले.गोरगरिबांसाठी २.५ कोटी घरे आणि १९. ७२ कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत, ९ कोटीपेक्षा अधिक कुटुंबाना उज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलेंडर दिला. या योजनेतील सिलेंडरवर २०० रु. सबसिडीही दिली .
आयुष्मान योजनेतून ५ लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले. करदात्यांच्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोदी सरकारने डीबीटी प्रणाली प्रत्यक्षात आणल्याच्या त्या म्हणाल्या. कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लसीचे २२० कोटी डोस मोफत देऊन लसीकरण अभियान प्रभावीपणे अंमलात आणले. तसेच बीड जिल्ह्यात किसान सन्मान योजने अंतर्गत सुमारे 513216 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजना अंतर्गत 1634532 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत 35253 तसेच शहरी आवास योजने अंतर्गत 15928 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ( ग्रामीण ) 3 लक्ष पात्र लाभार्थ्यांना रु. 12 हजार प्रमाणे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच 225 सार्वजनिक शौचालय बांधकाम रु. 3 लक्ष प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आले.
अनेक प्रश्नाला दिलखुलास पणे उत्तर देताना खासदार ताईंनी आपण 9 वर्षाच्या काळात जिल्ह्याचे नेतृत्व करताना सर्वाना सोबत घेऊन, सर्वांग विकास केल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकाच्या योजना जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहचवण्यात मला यश आले. जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या नगर- बीड – परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला. भविष्यात लवकरच बीड पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण होणार असल्याची खात्री त्यांनी दिली.
दळणवळनाच्या दृष्टीने आपला जिल्हा सक्षम झाला असून, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जिल्हाभरात उभारले असून, ग्रामीण तथा तालुक्याला जोडणारे सर्व रस्ते केंद्र तथा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण केल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान आवास योजनेद्वारे लाभार्थ्यांना घरकुल असेल, त्याचबरोबर उज्वला योजना असेल, मुद्रा योजनेद्वारा कर्ज, स्वच्छ भारत तथा शौचालय उभारणी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात राबवण्यात आम्हाला यश आल्याचा दावा त्यांनी केला. प्रास्ताविक राम कुलकर्णी यांनी केले तर, आभार जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मानले.