डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद॒घाटन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातून हजसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंना संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रविवारी (दि. 28) जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते हज यात्रेकरुंना डोस पाजून या विशेष लसीकरण मोहिमेचे उद॒घाटन झाले. यावेळी 323 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ज्यामध्ये 159 पुरुष आणि 164 महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यातून 450 मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रेला जाणार आहेत. आयुष्यातून एकदा हज यात्रा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हज यात्रेसाठी जगभरातून कोट्यावधी भाविक येत असतात. तसेच दुरचा विमान ्रपवास देखील आहे. यामुळे यात्रेदरम्यान कुठल्या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊ नये यासाठी विविध आजारांना प्रतिबंध करणारी लस हज यात्रेकरुंना यात्रेच्या अगोदरच दिली जाते. जिल्हा रुग्णालयात आवश्यक लसीचा साठा उपलब्ध केल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालय व राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लसीकरण करण्यात येत असल्याचेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले.
हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली लसीचे डोस पाजण्यात आले. आवश्यकतेनुसार त्यांच्या इतर तपासण्याही करण्यात आल्याची माहिती, डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. सकाळी 10 वाजता सुरु झालेले विशेष लसीकरण शिबीर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालले. यातून उर्वरित हज यात्रेकरुंना नंतर लसीचे डोस दिले जाणार आहेत.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संतोष शहाणे, डॉ. शाफे, डॉ. फरिदा शेख, हज कमिटीचे चेअरमन जमिल अब्दुल कादर, सचिव मोहम्मद फाराेकी इरफान आदींची उपस्थिती होती.