संबंधितांवर कारवाई करा अन्यथा हायकोर्टात दाद मागणार – मुकरमजान पठाण
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड नगर पालिकेने हद्दी बाहेरील नियमबाह्य लेआउट केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी लेआऊट रद्द करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल दिली. सदर प्रकरणी कार्रवाई करीत संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुकरमजान पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरूवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुकरमजान पठाण यांनी सांगितले की, बीड नगर पालिकेने हद्दी बाहेरील नियमबाह्य लेआउट केले होते. त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संबंधित लेआउट विषयी संपूर्ण माहिती चा अहवाल मागितला होता. बीड नगरपालिकेने हद्दीबाहेरील सर्व्हे नं. 119 तरफ गिराम मधील जागेचे नियम बाह्य लेआऊट रद केले होते. तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व नगररचनाकार यांनी संगनमताने केलेले नियमाबाह्य लेआऊट रद्द करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती तक्रारदार मुकरमजान पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कथित स्वरूपात तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व नगररचनाकार यांनी भूमाफीयांशी संगनमत करून सर्व्हे नं.108 व नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील सर्व्हे नं. 119 चे ले आउट केले होते. या दोन्ही सर्व्हे नंबरच्या एकच संचिका बनवून लेआऊट मंजुर करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी भूमाफीयांशी संगनमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारित करण्यात आला होता.
याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे नं.108 व सर्व्हे नं. 119 तरफ गिराम मधील लेआऊट तात्काळ रद्द करण्याचे आदेश बीड न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणात लेआऊट रद्द करून संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे मुकरमजान पठाण यांनी सांगितले.