मानवाच्या कल्याणासाठी नियमाचे पालन आवश्यक – एसपी नंदकुमार ठाकूर
ईद मिलन मुळे सामाजिक भाईचारा निर्माण होतो – एएसपी पंकज कुमावत
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जमाअत-ए-इस्लामी हिंद च्या वतीने सामाजिक सौहार्द, राष्ट्रिय एकात्मता वाढीस लागण्यासाठी, एक दुसऱ्या समाजाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावा यासाठी रमजान ईदच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर, परळी येथे बुधवारी (दि.१०) करण्यात आले होते.
या ईद मिलन कार्यक्रमाचे अध्क्षस्थानी भारतीय समाज जमाअत-ए-इस्लामी हिंद चे सचिव डॉ सय्यद रफिक पारनेरकर, प्रमुख पाहुणे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, संभाजीनगर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, सय्यद इफतेखार, सय्यद अन्वर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले की, धर्म माणसाने माणसासाठी निर्माण केले आहेत, मानवाच्या कल्याणासाठी नियमाचे पालन करा. महाराष्ट्र भूमी ही महामानवाची भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या सारखे महामानव देशाला दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. या भूमीत आपण जन्माला आलो हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन नंदकुमार ठाकूर यांनी केले.
यावेळी डॉ. रफीक पारनेरकर अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की,छत्रपती शाहू महाराज यांनी पवित्र कुराणाचे मराठी अनुवादासाठी पुढाकार घेतला होता. पंकज कुमावत यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, ईद मिलन कार्यक्रमामुळे सामाजिक भाईचारा निर्माण होतो. या ईदमिलन कार्यक्रमास मराठा सेवा संघचे प्रा एम एल देशमुख, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे भगवान साकसमुद्रे, सय्यद सबहत अली, सय्यद उम्मर, प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटीचे सदस्य, सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.