पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध -खा. प्रितम मुंडे ; व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांना अच्छे दिन येतील -खा. इम्तियाज जलील
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राजकारणात मीडियाला टाळून काहीही होत नाही. माझे मीडियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा होईल. ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, अशी ग्वाही खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी दिली. देशभरात व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. व्हॉईस ऑफ मीडियााच्या नेतृत्वाकडे पाहता पत्रकारांचे देखील अच्छे दिन येतील, असा विश्वास खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
बीड येथील वैष्णो पॅलेस येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन खासदार डॉ.प्रितम मुंडे, खासदार इम्तियाज जलील हस्ते रविवारी (दि.30) सकाळी 11.30 वाजता झाले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, विविध विंगचे प्रमुख उपस्थित होते.
खा.डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या, आपण राजकीय आयुष्यात कधीही नकारात्मक बातमी दिली अथवा पेरली नाही. बीडच्या मीडियाशी ऋणानुबंध आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणार्या पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशन होत आहे. अधिवेशनात चर्चिले जाणारे प्रश्न सोडविण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे. खा. इम्तियाज जलील म्हणाले, एका वृत्त समूहाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी तरुण पत्रकारांमध्ये आग आहे, परंतु मालक विकले गेले आहेत असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याशी आपण सहमत आहे. देशात विरोधक आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जाणारा मीडिया नको असेल तर लोकशाही कमजोर होईल. तसेच, आता पत्रकारही इमानदारीने पत्रकारिता करतील का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याऐवजी शाळा अथवा दवाखाना उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. स्मारकाच्या ठिकाणी आता दवाखाना होत असून त्याला मुंडे यांचे नाव देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याची माहिती दिली. सुरुवातीस व्हॉईस ऑफ मीडियाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच, राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, परवेज खान, जयपाल गायकवाड, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष चेतन कात्रे, रेडीओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, रेडिओ विंग राज्य प्रमुख इरफान इस्माईल सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या साक्षीने संदीप काळे यांनी पत्रकारांना शपथ दिली. प्रास्ताविक संजय मालाणी यांनी केले. सूत्रसंचलन अमोल मुळे, गणेश सावंत, व्याख्याते राहुल गिरी यांनी केले. आभार बालाजी मारगुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा, जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी प्रयत्न केले. अधिवेशनाला 800 हून अधिक पत्रकारांनी हजेरी लावली.
पत्रकारांसाठी लढत राहणार -संदिप काळे
पत्रकारांना विमा कवच, पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान, सेवानिवृत्तीनंतर आयुष्याचे नियोजन ही संघटनेची धोरणे आहे. याशिवाय पत्रकारांच्या इतर प्रश्नांवर व्हॉईस ऑफ मीडिया लढा देत आहे. नुकत्याच शासनाकडून 10 कोटी रूपयांच्या शासकीय जाहिराती देण्यात आल्या त्यातील 90 टक्के खर्च हा कधीही ग्रामीण भागात न पोहोचणार्या इंग्रजी वृत्तपत्रातील जाहिरातींवर करण्यात आला होता, याकडे आपण लक्ष वेधले. जीएसटीमधून सुट द्यावी अशी मागणी लावून धरली. रेल्वेतील आरक्षण रद्द केल्यामुळे विभागाला न्यायालयात खेचले. सकारात्मक पत्रकारितेसाठी 4 लाखांचे पुरस्कार घोषित केले असून 2800 पत्रकारांची नोंदणी झाली आहे. पत्रकार आणि पत्रकारितेसाठी सुरु केलेला लढा लढत राहणार, असे मत राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केले.
विश्वासार्ह मजकूर द्यावा-विलास बडे
अनेक पत्रकारांचे हल्ल्यात मृत्यू झाले. त्यावेळी समाज पत्रकाराच्या मागे उभा राहिला नाही. अर्थकारणाशिवाय आता पत्रकारिता शक्य नाही. समाजाने हे स्वीकारण्याची गरज आहे. पोर्टल, युट्यूब चॅनल, इलेक्ट्रॉनिक वा वृत्तपत्र असे कोणतेही माध्यम असो, पत्रकारांनी विश्वासार्ह मजकूर द्यावा. कौशल्य विकसित करण्याची देखील गरज आहे. आता सामान्य पत्रकारांना व्हॉईस ऑफ मीडिया ताकद देईल, असे मत टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे यांनी व्यक्त केले.
पत्रकारांवर आत्मचिंतनाची वेळ- मंदार फणसे
मी माध्यमात सक्रिय आहे. आताची पत्रकारिता पारतंत्र्यात गेली आहे. पत्रकारितेची चौकट लक्षात घेण्याची गरज आहे. लाज वाटाची अशी परिस्थिती निर्माण झाली असून आत्मचिंतनाची वेळ आली आहे, असे मत राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे यांनी व्यक्त केले. त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शेटे, डॉ.साबळेंच्या उपस्थितीत समारोप
खास पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या दुसर्या सत्राचे उद्घाटन व्हाईस ऑफ मीडियाच्या विविध विंगच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झाले. तर तिसर्या सत्राचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे सहायक सचिव ओमप्रकाश शेटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या हस्ते झाले. पत्रकारांनी संवेदनशीलता जपावी असे मत शेटे यांनी व्यक्त केले. तसेच पत्रकारांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ.साबळे यांनी सांगितले. राष्ट्रगिताने अधिवेशनाचा समारोप झाला.