डॉ. सुरेश साबळेंच्या नेतृत्वात एकाच वेळी चार ठिकाणी कारवाई
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या सुरु असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रांवर शनिवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळेंच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली. बीडसह अंबाजोगाईतील दोन व केजमधील एक अशा चार ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली गेली. यात औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात अनधिकृतपणे व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली गोरखधंदा सुरु होता. वाघाळा येथील केंद्रातील छळाबद्दल एका महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दिल्याने केंद्रसंचालीकेसह इतरांवर शुक्रवारी विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर शनिवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्याशी चर्चा करुन पाेलिसांची मदत घेऊन नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, मोरेवाडी केज शहरातील एक व बीड शहरातील एक अशा चार केंद्रांवर छापे मारले. वाघाळा येथे डॉ. मोमीन मुजाहेद व डॉ. संजय राऊत, केज येथे डॉ. चंद्रकांत चव्हाण, मोरेवाडी येथे डॉ. अरुणा केंद्रे व आयपीएस पंकज कुमावत तर, बीड येथे डॉ. साबळेंसह एसीएस डॉ. संतोष शहाणे, आरएमओ डॉ. राम आव्हाड, पीआय रवी सानप यांच्या पथकाने कारवाई केली.
चारही केंद्रात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी झालेली औषधे आढळून आली आहेत. कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक व आवश्यक असलेला इतर कर्मचारी वर्ग आढळून आला नाही. रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने मानसीक औषधे देऊन उपचार सुरु असल्याचे आढळून आले आहे. वाघाळा येथे ७५, मोरेवाडीत २२, केजमध्ये १६ आणि बीड येथे २८ रुग्ण उपचाराखाली होती. यातील काही रुग्णांना घरी सोडले गेले तर, काही रुग्ण उपचारासाठी बीड, केज व अंबाजोगाई रुग्णालयात हलवले आहेत. वाघाळा येथे जास्त संख्येने रुग्ण असल्याने हे केंद्र ताब्यात घेऊन इथेच त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जाणार आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
औषध विभागाला या कारवाईची माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले होते. त्यांनी औषधी जप्त केली आहेत. कशा प्रकारे गुन्हा नोंद करायचा याबाबत वरिष्ठ अधिकारी,पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा करुन गुन्हा नोंद व पुढील कारवाई केली जाईल. आरोग्याशी खेळण्याचे काम सहन केले जाणार नाही.