ताशी 144 किलोमीटर धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेची चाचणी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सोलापूरवाडी ते आष्टी नवीन रेल्वेमार्गावर जलदगती चाचणी करण्यासाठी 29 व 30 डिसेंबर रोजी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. या लोहमार्गावर नागरिकांनी थांबू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून प्रशासन पातळीवर तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

बीड जिल्हावासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गापैकी सोलापूरवाडी ते आष्टी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 29 व 30 डिसेंबर रोजी जलदगती चाचणी होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे.
पिंपळा, कुंटफळ, कुंभेफळ, चिंचोली, धानोरा, साबलखेड, कडा, शेरी, जळगाव मांडवा, कासारी, राधापूर व आष्टी येथील तलाठी, सरपंच, मंडलाधिकारी, ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर लोंकानी थांबू नये, आपली जनावरे बांधू नयेत, आपल्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यअभियंता (निर्माण) मध्य रेल्वे अहमदनगरच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तशी कल्पना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे आष्टी, अंभोरा यांना देण्यात आली आहे.
64 किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम 100 टक्के पूर्ण
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावरनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत नगर ते आष्टी या 64 किलोमीटर रेल्वेमार्गाचे तसेच पूल, स्टेशन आदी कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत. नगर-आष्टी या मार्गावर ताशी 144 किलोमीटर धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेची चाचणी करण्यात येणार आहे. नगर-बीड रेल्वेमार्गासाठी अंदाजे 2 हजार 826 कोटी रुपये खर्च येणार आहे. नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्य सरकारने या रेल्वेमार्गासाठी 90 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.