2011 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आयएएस अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या लवकरच आपला पदभार स्वीकारतील. मंगळवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे.
नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे 2011 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कामिगरी उल्लेखनीय ठरली. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. तेथून औरंगाबाद येथे जीएसटी विभागात सेवा बजाविल्यानंतर त्यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. कोरोना कालावधीत त्यांनी सलग 37 दिवस संपूर्ण जिल्हा ‘ग्रीन झोन’ मध्ये ठेवला होता. कोरोना कालावधीत त्यांच्या कामाची प्रशंसा झाली होती. कोरोनाच्या लाटेत उपचारांचे योग्य नियोजन केले होते. दरम्यान अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्यांनी वचकही ठेवला होता.
त्या सध्या औरंगाबाद येथे सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत होत्या. बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी होण्याचा रेकार्ड त्यांच्या नावे नोंद होईल. विद्यमान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीचे अद्याप आदेश आलेले नाही. मात्र, त्यांची मराठवाड्याबाहेर बदली होईल अशी चर्चा आहे.