ग्रंथ दिंडी व ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातील ग्रंथ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन व प्रशासन कायम प्रयत्नशील राहणार आहे, या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा ग्रंथालय साठी एक एकर जागा जिल्हा क्रीडा संकुल समोर देण्यात आली असून त्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. तर, वाचन कमी होत चालल्या बाबत सतत चर्चा केल्या जातात परंतु मानव प्राणी निसर्गाच्या सानिध्यात आल्यापासून स्वतःला आणि निसर्गाला देखील वाचत प्रगती साधत आहे. ते वाचन आज देखील कमी झालेले नसून या वाचन संस्कृतीच्या पद्धती मात्र बदलल्या आहेत, असे उद्गार लेखक श्री. कांबळे यांनी काढले.
बीड ग्रंथोत्सवचे आयोजन चंपावती विद्यालय येथे करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बोलत होते. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन लेखक व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, जिल्हाधिकारी श्री.शर्मा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झाले. ते पुढे म्हणाले, बीड जिल्हा ग्रंथोत्सव कार्यक्रमासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनी वेळ दिला आहे आणि ते स्वतः पूर्ण वेळ उपस्थित आहेत. ही ग्रंथ चळवळीसाठी आनंदाची बाब असून प्रशासनाच्या पाठिंबा व प्रोत्साहनामुळे ग्रंथ चळवळ वाढेल , असे समाधान लेखक उत्तम कांबळे याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
दिंडीत विद्यार्थी विद्यार्थिनी उत्साहात सहभागी
आज सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून ग्रंथ दिंडीस सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर व तहसीलदार सुहास हजारे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला ज्ञानेश्वरांचा वेशभूषा केलेला विद्यार्थी रथामध्ये बसून दिंडीत सहभागी झाला होता तर ग्रंथ ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन साहित्य दिंडीचे वारकरी देखील सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत शहरातील चंपावती विद्यालय, भगवान विद्यालय, शिवाजी विद्यालय, यशवंत विद्यालय आदी शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते . नगर रस्त्याने जाऊन सदर दिंडीचा समारोप ग्रंथोत्सवाच्या ठिकाणी चंपावती विद्यालयाच्या प्रांगणात झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे व ग्रंथोत्सवाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दीप प्रज्वलन करून सुरुवात झाल्यानंतर वैद्यकीय उच्चशिक्षणासाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी श्री. शर्मा,साहित्यिक श्री.कांबळे राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोठेवाढ, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामजी मेघले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या वतीने नोंदणी करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या व सदर गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित त्यांचे आई-वडील व पालक यांचा गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभात जवळपास 50 विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारण्यात आला.
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये आज श्री. सुनील हुसे, श्रीमती सुशिला मोराळे यांच्या प्रमुख सहभागाने व डॉ. विठ्ठल जाधव यांच्या सूत्रसंचालनाने मी आणि माझे वाचन हा परिसंवाद तसेच प्राध्यापक डॉ. रेखा ढेरे यांचा प्रमुख सहभागाने बालकवी संमेलन व डॉ. भास्कर बडे यांच्या प्रमुख सहभागाने कथाकारांचे कथाकथन अधिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी समारोप
तसेच उद्या, शनिवारी परीसंवाद 2 साठी स्पर्धा परीक्षांबाबत माजलगाव येथे नियुक्त सहायक पोलिस अधिक्षक आयपीएस श्री धीरजकुमार तसेच उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप हे मार्गदर्शन करण्णर आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांचे कथाकथन, कविंचे कवी संमेल्लन होईल आणि समारोप कार्यक्रम होईल. उद्या शनिवार सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार असून नागरिक ग्रंथ प्रदर्शनास व येथील पुस्तक विक्रेत्यांच्या भेटी देऊ शकतात.