भ्रष्टाचाराचे मूळ नष्ट करण्यासाठी 2024 लोकसभा हेच आता अंतिम ध्येय
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सम्राट अशोक यांच्या राजवटीत जसा भारत देश अखंडित होता, तसाच पुन्हा एकदा हा देश अखंडपणे उभा करण्यासाठी अखिल भारतीय पार्टीची निर्मिती करण्यात आली आहे. येणाऱ्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षाची पाठ लोळून लोकसभेवर निर्विवाद वर्चस्व सामान्य जनतेच्या हितासाठी निर्माण करणार असल्याचा आत्मविश्वास राष्ट्रीय अध्यक्ष राजीवसिंह कुशवाह यांनी व्यक्त केला.
बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय परिवार पार्टीची शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय अध्यक्ष राजीवसिंह कुशवाह तसेच राष्ट्रीय मुख्य महासचिव कृष्णनंदू चटलजी भारतीय, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रभारी महाराष्ट्राचे कलीम जहांगीर भारतीय यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष राजीवसिंह कुशवाह भारतीय म्हणाले, केवळ राजकीय आणि स्वतःच्या फायद्यासाठी या अखंडित भारतीय भूमीचे आणि समाजाचे सुद्धा जाणीपूर्वक तुकडे तुकडे पाडण्यात आले. हे तोडलेले तुकडे पुन्हा एकदा जोडण्याची दिव्य स्वप्न आम्ही हाती घेतले आहे. हे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आता मागे हटणार नाहीत.एक वेळ आम्ही संपू पण मागे हटणार नाहीत हा निश्चय आहे.आम्ही मन की बात करत नाहीत तर जनतेचा आवाज होऊन संवाद कार्य हाती घेतलेले आहे. अखिल भारतीय परिवार पार्टीची निर्मिती देशातील 250 सदस्यांना सोबत घेऊन 2018 मध्ये करण्यात आली आहे.
8 ऑगस्ट रोजी या पार्टीला अधिकृत रित्या क्रांतिदिनी जाहीर करण्यात येणार आहे. 2024 पूर्वी पार्टी कोणती निवडणूक लढवणार नाही, मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून पुढे कोणतीच निवडणूक सोडणार नाही. भ्रष्टाचाराचे खरे मूळ हे लोकसभेच्या संसदेपासून आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे मूळ जिथून आहे त्याच लोकसभेमध्ये भारतीय परिवार पार्टीच्या विचाराचे प्रभुत्व निर्माण करून हा संपूर्ण देश भ्रष्टाचार मुक्त आणि विकसित करण्याचा पायाभूत निर्णय घेतलेला आहे. ही पार्टी साधारण राजकीय पार्टी नाही तर राजकीय क्रांती निर्माण करणारी ठरणार आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोघेही केवळ स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन राजकारण करणारे पक्ष आहेत. काँग्रेस ही अशी नाली आहे ज्यामध्ये भाजपा सारखे किडे जगतात असा घणाघात करून, त्यांनी आमची देशात सत्ता आल्यानंतर जे नियम नेत्यांना असणार तेच नियम जनतेलाही असतील अशी घोषणा करत येणाऱ्या 2024 मधील सर्व लोकसभा निवडणुका लढून जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रीय मुख्य महासचिव कृष्णदू चटलजी भारतीय म्हणाले की, अखिल भारतीय परिवार पार्टीने आपला मूळ पाच विचारांचा पाया निश्चित केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आम्ही राजकारणामध्ये सुधारणा करणार आहोत. जो लोकप्रतिनिधी निवडून येईल तो निवडणुकीत जो शब्द देईल, आश्वासन देईल तो पाळणे बंधनकारक राहील. निवडून आल्यावर जर त्याने दिलेला शब्द पाळला नाही तर त्यावर कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील. जर या देशात नोकरदारांचे पेन्शन बंद होत असेल तर लोकप्रतिनिधींची सुद्धा पेन्शन आम्ही बंद करू ज्या पद्धतीने शासकीय नोकरदारांना निवृत्तीचे वय निश्चित आहे त्याच धर्तीवर लोकप्रतिनिधींना सुद्धा निवृत्तीचे वय निश्चित असले पाहिजे हे आमचे धोरण राहील. महिलांना राजकारणात 35 ते 50 टक्क्यांपर्यंत आम्ही अधिकृत वाटा देणार आहोत. बेरोजगारांची संख्या वाढत आहे, त्यास कारणीभूत शिक्षण आहे. त्यात सुधारणा केली जाईल. सर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा खर्च आमचे सरकार विनामूल्य करेल. एवढेच नव्हे तर जनतेला विनामूल्य आरोग्य सेवा देखील आम्ही देण्याचा शब्द देत आहोत. कृषी क्षेत्रात योग्य त्या सुधारणा करण्याचा निश्चय आहे.
व्यापार व कर वाणिज्य स्थितीमध्ये खूप विचित्र प्रकार आहेत. ज्यातून भ्रष्टाचाराला वाढण्याची संधी आहे. त्यामुळे व्यापार व कर प्रणाली मध्ये आम्ही आमूलाग्र बदल करणार आहोत. सशस्त्र बल क्षेत्रामध्ये बदलत्या काळानुसार बदल होणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने आजही पोलिस अथवा सैन्यदलकडे जुनेच शस्त्र आहेत. त्यांना नवीन सशस्त्र देणे, त्यांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. शहीद होणार्या प्रत्येक भारतीयांच्या कुटुंबीयांना आम्ही कुटुंब प्रमुख या नात्याने सवलत देण्यास कटिबद्ध राहूत. यासह अनेक विचारधारांना सोबत घेऊन या देशात आमूलाग्र बदल करण्याचा निश्चय अखिल भारतीय परिवार पार्टीने केला आहे. ही पार्टी येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात निश्चितपणे राजकीय क्रांती घडवेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. पत्रकार परिषदेमध्ये प्रास्ताविक आणि आभार अखिल भारतीय परिवार पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रभारी महाराष्ट्राचे कलीम जहांगीर भारतीय यांनी मानले.