वीजचोरीचा नवा फण्डा : महावितरणही चक्रावले
By MahaTimes ऑनलाइन – औरंगाबाद |
वीज चाेरीमीटरचे स्क्रोल बटन टाचणीच्या सहायाने दाबून ठेऊन लाखो रुपयाची वीज चोरी केल्याचा प्रकार औरंगाबादेत नुकताच उघड़किस आला. याप्रकरणी मंगळवारी प्लास्टिक बॉटल कारखाना चालकाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज चोरीसाठी विजग्राहक विविध फन्डे आजमावत असतात. नारेगावातील सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमधील हिलाबी इंजिनिअरिंग वर्क्समध्ये प्लास्टिक बॉटल तयार करण्याच्या कंपनीत चक्क टाचणीचा वापर करून तीन लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे प्रधान तंत्रज्ञ सतीश दिवे हे वीज बिल वसुलीसाठी 17 ऑगस्ट रोजी या कारखान्यात गेले. त्यांनी मीटरची पाहणी केली तेव्हा वीजवापर सुरू होता. परंतु मीटरमधील डिस्प्ले गायब झालेला होता. दिवे यांनी सहायक अभियंता श्याम मोरे यांना ही माहिती दिली. मोरे यांनी दिवे, तंत्रज्ञ विनोद सावळे, शंकर कड, काही कंत्राटी कर्मचारी व दोन पंचांना सोबत घेऊन मीटरची बारकाईने पाहणी केली. तेव्हा वीज चोरी होत असल्याने समोर आले. मीटरचे स्क्रोल बटन टाचणी खोचून दाबून ठेवण्यात आले होते. स्क्रोल बटन जोपर्यंत दबलेले आहे, तोपर्यंत डिस्प्ले गायब होत होता. त्यामुळे वीज वापराची मीटरमध्ये नोंद होत नव्हती. नंतर महावितरणच्या प्रयोगशाळेतही मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार करून वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
महावितरणने हनुमान मुंडे यांना 25 हजार 200 युनिट्सची वीजचोरी केल्याचे 2 लाख 99 हजार 458 रुपयांचे वीज बिल दिले. मात्र, हे बिल न भरल्यामुळे सहायक अभियंता श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून हनुमान मुंडे यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.