एकाएकी रायुकाँ जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा; बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खळबळ उडाली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी अचानक शनिवारी ( दि.१४ ) पदाचा राजीनामा दिला आहे. सोळंके यांच्या अचानक राजीनाम्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील दोन तीन महिन्यापासून सोळंके कुटुंब पक्षावर नाराज असल्याचे चर्चेत होते. आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाने ज्येष्ठ सदस्य असताना ही मंत्री पदाची संधी दिली नाही. तसेच नुकत्याच साखर संघाच्या अध्यक्षपदी आ. सोळंके यांची वर्णी लावण्यात येणार होती, मात्र तिथे पक्षाने उपाध्यक्ष पदावर त्यांची बोळवण करण्यात आली होती. चार पाच दिवसापूर्वी शिक्षक आमदार निवडणूक संदर्भात बैठकीस ही आ. सोळंके सक्रिय दिसले नाही. तर आज शनिवारी जयसिंग सोळंके यांनी अचानक पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याकडे दिला. यामुळे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे.
कोण आहेत जयसिंह सोळंके?
बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती असणारे जयसिंह सोळंके माजी उपमुख्यमंत्री, स्व.सुंदरराव सोळंके यांचे नातू, माजी मंत्री तथा माजलगाव मतदारसंघाचे मा. आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे पुतणे, माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धैर्यशिल सोळंके यांचे पुत्र, जयसिंह सोळंकेंना 2012 साली मोहखेड या जन्मभूमीच्या गणातून पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आली. मोठ्या मताधिक्याने विजयी होत राजकारणात यशाचा श्रीगणेशा केला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत जिल्हा परिषदेत अर्थ आणि बांधकाम सभापती झाले. जिल्हा परिषदेची आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना जयसिंह सोळंके यांनी विकास कामाच्या योजना माजलगाव विधानसभा मतदारसंघात आणल्या.