सुप्रसिद्ध लेखक गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अन्य नामवंतांच्या भेटी-गाठी
By MahaTimes ऑनलाइन |
दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या उर्दू (रेख़्ता ) उत्सवात बीड जिल्ह्यातून विशेष निमंत्रित असलेले सुप्रसिद्ध शायर उर्दू कवी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हसीन अख्तर उपस्थित आहेत. त्यांनी तिथे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम लेखक, गीतकार, कवी तथा शायर जावेद अख्तर यांची भेट घेऊन स्वतःचा परिचय करून दिला असता जावेद अख्तर साहेबांनी स्वलिखित जादूनामा हे पुस्तक हसीन अख्तर यांना सप्रेम भेट दिली. एवढेच नव्हे तर पुस्तकाच्या पहिल्या पानावर हसीन अख्तर यांच्या नावासह सप्रेम भेटीचे उल्लेख करून खाली स्वतःची सही व दिनांक सुद्धा नमूद केले.
तसेच उर्दू साहित्यकार तथा उर्दू दैनिक इन्कलाब चे संपादक शकील हसन शम्सी यांनीही मास मीडिया आणि पत्रकारिता हे पुस्तक स्वतःचे नाव व सहीसह हसीन अख्तर यांना सप्रेम भेट दिली आहेत. शिवाय अन्य उर्दू साहित्यकाराची सुद्धा मोठ्या प्रमाणात भेटी गाठी घेतल्याने बीडच्या ‘हसीन’ मुसाफिराची दिल्लीत दखल घेण्यात आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नवी दिल्ली येथे दिनांक २, ३ आणि ४ डिसेंबर २०२२ असे तीन दिवसीय उर्दू (रेख़्ता) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात संपूर्ण भारतभरातून अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ उर्दू साहित्यकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. नामवंत उर्दू साहित्यकारांची या महोत्सवात अक्षरशः मांदियाळी होती. उर्दू क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंतांनाच या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. संपूर्ण बीड जिल्ह्यातून सय्यद हसीन अख्तर हे एकमेव उर्दू साहित्य कवी व शायर या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित होते.
या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीमुळे बीड जिल्ह्याच्या मानात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापुढे ही हसीन अख्तर उर्दू साहित्य क्षेत्रात नेहमीप्रमाणे आपली ‘हसीन’ मुसाफिरी सुरूच ठेवतील यात दुमत नाही.