देवदुत कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. अरूण भस्मे यांचे प्रतिपादन
By MahaTimes ऑनलाइन |
कोल्हापुर : आपत्कालीन व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करू नये हे सुध्दा माहित असणं गरजेचं असल्याचं सांगितलं असे प्रतिपादन डॉ अरुण भस्मे यांनी वेणूताई चव्हाण होमिओपॅथीक कॉलेज कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशन्सच्या वतीने आयोजित देवदुत कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी केले.
कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटना आणि वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घेतली पाहिजे यासाठी डॉ. राजेंद्र जगताप यांची ‘’देवदूत’’ ही एकदिवसीय कार्यशाळा शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे दि. 22 नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी पूणे येथील आपत्कालीन व्यवस्थापन शिक्षक होमिओपॅथीक तज्ञ डॉ. राजेंद्र जगताप वक्ते म्हणून तर, होमिेओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड, वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे चेअरमन संदिप चव्हाण, सचिव डॉ. नितीन बेलनेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. संदिप पाटील, जिल्हा होमिओपॅथीक संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्यामप्रसाद पावसे, उपाध्यक्ष डॉ. जयवंत पाटील, डॉ. किरण खोराटे, सचिव डॉ. श्रीकांत लगंडे इ. उपस्थित होते.
हार्ट अटॅक (ह्रदय बंद) यासारख्या आपत्कालीन काळामध्ये सामान्य नागरिकांनी अपघात ग्रस्त व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे हे प्रात्यक्षिकासह पुणे येथील जागतिक स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दाखवले. अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करायला सर्वप्रथम आपण सुरक्षित आहोत का, रूग्ण नेमका कोणत्या कारणाने बेशुदध पडला आहे हे कसे ओळखायचे, गोंधळून न जाता 108 नंबरला फोन करणं ,मदतीला लोकांना बोलवणं, आणि कोणतेही अद्यावत वैद्यकीय उपकरण सोबत नसताना रूग्णाचा श्वास आणि ह्रदय कसं सुरू करायचे याचे प्रात्यक्षीक दाखवण्यात आलं. याशिवाय सर्पदंश, श्वासनलिकेत वस्तू अडकून श्वास गुदमरणे, इलेक्ट्रिक शॉक लागलं, पाण्यामध्ये बुडलेल्या व्यक्तीला नेमकी कशी मदत करायची हे प्रात्यक्षिकासह दाखवण्यात आले. तसेच ‘प्री हॉस्पिटल इमर्जन्सी मेडिकल केयर’ हा कोर्स लवकरच सुरू करणार असल्याचे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितलं.
उदघाटनपर भाषणात होमिओपॅथिचे नेते डॉ. अरूण भस्मे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करू नये हेसुध्दा माहित असणं गरजेचं असल्याचं सांगितलं व लवकरच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आपत्कालीन व्यवस्थापन हा सर्टिफिकेट कोर्स सुरू करणार असल्याचे सांगितले. स्वागतपर भाषणात डॉ. नितीन बेलनेकर यांनी वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने आजपर्यंत समाजासाठी मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिविराचे आयोजन, आरोग्यविषयक जनजागृती केली असून होमिओपॅथी शास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कॉलेजच्या माध्यामातून जे काही लागेल ते देण्यात येईल असे सांगितले. प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्यामप्रसाद पावसे यांनी आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर वारीत वारकरी संप्रदायासाठी मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन, होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी मोफत होमिओपॅथिक चर्चासत्राचे आयोजन, वृक्षारोपण शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले व भविष्यात सुध्दा समाजासाठी व होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. चर्चासत्राचा प्रत्यक्ष 350 नागरिकांनी व फेसबुकद्वारे 4500 नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वीरधवल मोरे, डॉ. महेश पाटील, डॉ. गिरीश कोरे, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. विशाल सावंत, डॉ. सागर माने, डॉ. प्राची महाजन, डॉ. मोनाली सुभेदार, डॉ. मनोज भोपळे, डॉ. अजित कुमार कदम, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. प्रविण पाटील, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. पल्ववी व्हरे, नितीन पारटे इ. यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन डॉ. प्रिया दांडगे तर आभार डॉ. श्रीकांत लगंडे यांनी केले.