भाजपचे जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांचे पत्रक
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आयुष्यात मी कोणत्याही अवैध धंद्याला साथ दिली नाही असे, जयदत्त क्षीरसागर यांनी प्रामाणिकतेने सांगावे. कुंडल्या समोर आणल्या तर, आजची युवा पिढी क्षीरसागरांना माफ करणार नाही. क्षीरसागरांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा उगम आजही कायम आहे. याचे भान क्षीरसागर आणि त्यांच्या तितर बटर समर्थकांनी ठेवले पाहिजे. बहुजन समाजातील अनेक युवकांना नेतृत्व करण्यापासून रोखण्याचे पाप क्षीरसागरांनी यापूर्वी केलेले आहे. बदनामी करून नेतृत्व आता रोखता येणार नाही. यापुढे असे कटकारस्थान कोणीही खपवून घेणार नाही. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांनी दिला आहे.
बीड मतदार संघात सत्ता भोगून सत्तेच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम क्षीरसागरांनी केले. अडचणीत सापडलेल्या सामान्य माणसाला कधीही मदतीचा हात दिला नाही. जिल्ह्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील युवा नेते, कार्यकर्ते सामाजिक भान ठेऊन, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धावून येतात. दुष्काळाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या गुराढोरांचे रक्षण आणि पोषण करण्यासाठी गुरांची छावणी चालवतात. गुराढोरांना चारा आणि शेतकऱ्यांना भोजन देतात. त्यांच्या उपवर मुलामुलींचे मोफत विवाह लावून देण्याचे काम करण्यात आले. या पुण्य कर्मातही क्षीरसागरांच्या तितर बटरांना चारा घोटाळा दिसला. पण संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी जयदत्त क्षीरसागरांनी काय केले. त्यांनी कोणाला मदत केली का ?
गेली 25 वर्षापासून बीड नगरपरिषदेवर हुकूमत गाजवणाऱ्या क्षीरसागर बंधूंनी बीड शहराची कशी वाट लावली हे जनता अनुभवते आहे. विकासाच्या नावाखाली जनतेच्या स्वप्नांची होळी करून भ्रष्टाचाराचा नवा आदर्श निर्माण केला. सत्तेचा ठेका चालवत विकासाचा धुराळा लोकांच्या नाकात, तोंडात कोंबून नाम निराळे झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे आणि अस्वच्छता आणि धुराळामुळे लोकांना मणक्याचे आणि शोषणाचे आजार जडले आहेत. याचीही माहिती क्षीरसागरांनी सर्वे करून घ्यावी.
तत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासासाठी आपली पूर्ण राजकीय ताकद पणाला लावली. राष्ट्रीय पेयजल योजनेचे रूपांतर जलजीवन योजनेत होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गाव खेडे आणि वस्तीचा समावेश करूनच ही योजना देशभरात आणली. मी गावांचा समावेश केला हा टेंबा मिरवण्याची काही एक कारण नाही. लोकाभिमुख काम करनाऱ्या राजेंद्र मस्केंची बदनामी करणारे तितर बटर पदरात मलिद्याचा गोळा घेण्यासाठी पालकमंत्र्याच्या पायाशी लोळण घालताना आम्ही उघड्या डोळ्याने बघितले आहे. यापुढेही तितर बटरांनी कामापुरतेच बोलावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.