कुत्र्याचा दोष एवढाच होता की, ज्याने त्याला गोळी घातली त्याच्यावर तो भुंकत होता
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : परळी वैजनाथ येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. परळी- धर्मापुरी रोडवरील धारावती तांडा शिवार भागातील हॉटेल वीर बियर बार व हॉटेल येथील पाळीव कुत्र्याला एका निर्दयी सेवा निवृत्त अधिकाऱ्याने गोळी झाडून ठार (Dog Shoot in Parli, Beed Dist.) केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धर्मापुरी रोड येथे हॉटेल वीर बियर बार येथील पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत रामराज घोळवे यांनी गोळी झाडून ठार केल्याची घटना घडली असून विकास बनसोडे यांचा पाळीव कुत्रा सतत भुंकतो या कारणामुळे हॉटेल शेजारील शेतकरी रामराज घोळवे यांनी हॉटेलच्या पार्किंग मध्ये दोन पाळीव कुत्रे असताना त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कुत्रा जखमी झाल्याचे समजते.
याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल चे मालक विकास बनसोडे यांच्या तक्रारीवरून रामराजे घोळवे यांच्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये प्राणी क्रुरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे हे करत आहेत.
प्राणी मित्र आक्रमक; कठोर कारवाई मागणी
कुत्र्यावर गोळी झाडून ठार मारल्याच्या घटना समजताच प्राणी मित्र आक्र मक झाले आहेत. मुक्या प्राण्यास निर्दयीपणे ठार मारणाऱ्या आरोपीस अटक करून कठोर कारवाई करावी. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ही प्राणी मित्रांनी केली आहे.