By MahaTimes ऑनलाइन |
बीड : एक अल्लाहची उपासना करा, आपले आचरण सुधारा, सर्वांशी प्रेमाने वागा आणि मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या सतमार्गावर चालुन इतरांनाही सत्कर्मासाठी प्रेरित करा. जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण आतापर्यंत कसे जीवन व्यतीत केले याचे प्रत्येकाने आत्मचिंतन करावे असे आवाहन मौलाना साद अब्दुल्ला साहब यांनी शुक्र वारी इज्तेमात मार्गदर्शन करतांना केले.
बालेपीर क्षेत्राचा एक दिवसीय इज्तेमा शुक्र वारी (दि. 28) रोजी ईदगाह बालेपीर येथे संपन्न झाला. यावेळी मौलाना साद अब्दुल्ला बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक बाब तयार करण्यामागे एक उद्देश असतो. अल्लाहने आपल्याला मानवजातीच्या कल्याणासाठी निर्माण केलेले आहे. जगाच्या झगमगाटात आपण आपले कर्तव्य विसरून गेलो आहोत. अल्लाहच्या आदेशाचे पालन करावे आणि मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या सतमार्गावर चालुन आपले व इतरांचे कल्याण करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आई-वडीलांचा आदर सन्मान करा, इस्लामच्या तत्वाचे पालन करा असे आवाहन केले. आपल्या मुलांमध्ये इस्लाम की शिकवण जीवंत करा. तरच ते आपले व इस्लामचे नाव उज्ज्वल करतील. यासाठी त्यांना इस्लामची शिकवण आचरणात आणण्यासाठी प्रेरित करा असा सल्लाही दिला. सामुहिक दुआने इज्तेमा समापन झाला. येथुन चार महिणे व चाळीस दिवसांसाठी जमाते रवाना झाली.
या इज्तेमासाठी बीड शहर व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदचा इज्तेमा यशस्वी करण्यासाठी बालेपीर क्षेत्रातील स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.