८६ पैकी ७५ संस्था अमरसिंह पंडित गटाकडे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गेवराई तालुक्यातील १०८ सेवा सहकारी संस्थांपैकी ८६ संस्थांची निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाली असून १७ संस्थांवर शासनाने प्रशासक नियुक्त केला आहे, तर ५ संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. निवडणुक प्रक्रिया पार पडलेल्या ८६ पैकी ७५ संस्था अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. निवडून आलेल्या १०९७ संचालकांपैकी ९९२ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे गेवराई तालुक्यातील सेवा संस्थांवर राष्ट्रवादीचा एकतर्फी झेंडा फडकल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेवराई तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. १०८ सेवा सहकारी संस्थांपैकी ८६ संस्थांची निवडणुक प्रक्रिया पूर्ण झाली असून ५ संस्थांची निवडणुक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणुक शक्य नसलेल्या १७ संस्थांवर सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शेवटच्या टप्प्यात ८६ पैकी ७५ सेवा सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व कायम राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांवर कायम लक्ष केंद्रीत करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकांमध्ये १०९७ संचालक निवडून आले असून त्यापैकी ९९२ संचालक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून देण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवसेना ०६ तर भाजपा केवळ ०३ सेवा सहकारी संस्थांवर विजय मिळविण्यात यशस्वी झाल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील उमापूर, मादळमोही, राक्षसभुवन, दैठण यांसारख्या सेवा सहकारी संस्था बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आले असून खांडवी, चकलांबा, सिरसमार्ग, रोहितळ, कांबी, राजापूर आदी ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तलवाडा, आंतरवली, गंगावाडी या संस्था भाजपने ताब्यात ठेवल्या असून मारफळा, बंगालीपिंपळा, रामपुरी, गुळज व इतर संस्थांवर शिवसेनेने माजी आमदार बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अनेक निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित पॅनल करूनही त्यांना लक्षणीय यश मिळालेले नाही.
या निवडणुकांची गावागावात जोरदार चर्चा
ग्रामीण भागात माजी आमदार अमरसिंह पंडित आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरून दिसून येत आहे. तालुक्यातील सेवा संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकतर्फी विजय झाल्यामुळे येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये सुध्दा राष्ट्रवादीचाच विजय होणार हे आता काळ्या दगडावरील पांढरी रेष असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. या निवडणुकांची जोरदार राजकीय चर्चा गावागावात झाली आहे. सेवा संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून एक राजकीय रणसंग्राम ग्रामीण भागात पहावयास मिळाला.