10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाण्याचा अंदाज
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : राज्यात परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे.
मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उद्या शनिवारी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 11 आाणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आाणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्टातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार नसून पावसाच्या हलक्या सरी बरसतील. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबेल.