बीड नगर परिषदेवर नवीन प्रशासक नेमावा -नवनाथ शिराळेंचे सरकारला साकडे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड नगरपालिके मार्फत नागरिकांना सेवा देण्याऐवजी क्षीरसागरांनी राजकीय अड्डा करून टाकला आहे. केवळ त्यांच्या स्वार्थी धोरणामुळे शहराची दयनीय अवस्था झाली असून, नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. आज पालिकेवर शासनाचा प्रशासक असला तरी, कारभारात कोणताही बदल झालेला नाही. प्रशासक आणि सिओ हुजरेगिरी करत कागदोपत्रीच काम करत आहेत. एसडीओ हा प्रशासनातला सक्षम अधिकारी यांचेकडून कर्तव्याची अपेक्षा असताना आज ते सांगकाम्याची भूमिका निभावत आहेत. असंवेदनशील व कर्तव्य शून्य प्रशासाकामुळे नागरिकांचे बेहाल थांबवण्यासाठी सरकारने तातडीने बीड नगरपालिकेसाठी कर्तव्यनिष्ठ व खमक्या प्रशासक द्यावा. अशी मागणी भाजपा जिल्हा सचिव तथा माजी सभापती नवनाथ शिराळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की,बीड नगर परिषदेवर गेली पाच – सहा मिहण्यापासून प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी ( SDM ) श्री नामदेव टिळेकर यांची शासनाने नेमणूक केलेली आहे. प्रशासक म्हणून त्यांनी अद्याप जबाबदारीने नगरपरिषद प्रशासनाकडे लक्ष दिलेले नाही.
बीड शहराची अत्यंत दयनीय अवस्था असून, नागरिकांचे हाल चालू आहेत. शहरात अस्वच्छतेमुळे बकाल अवस्था निर्माण झाली. रस्त्यावरील खड्डे , साचलेले पावसाचे पाणी, यामुळे रहदारीला त्रास होत आहे. अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांचे थैमान असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील बहुतांश भागातील पथिदवे बंद पडले असून, मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेली पंचवीस वर्षापासून शहराला पंधरा दिवसाला पाणी मिळते. या गंभीर प्रश्नाची सोडवणूक, प्रशासकामार्फत होईल अशी भावना सुजाण नागरिकांची होती.परंतु दुर्दैवाने भ्रष्ट सत्ताधारी यांचे जागेवर शासनाचा प्रशासक व मुख्याधिकारी असूनही नागरिकांना कोणतीच मुलभूत सुविधा अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. हे नागरिकांचे दुर्भाग्य आहे.
बीड नगरपालिकेचा कारभार पारदर्शक सुनियोजित चालवून नागरिकांना किमान मुलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कर्तव्यनिष्ठ व खमक्या प्रशासकाची नितांत गरज आहे. बीड शहराच्या त्रस्त नागरिकांची भावना व मागणी लक्षात घेऊन तातडीने नवीन प्रशासक नेमावा अशी आग्रही मागणी नवनाथ शिराळे यांनी केली आहे.