सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांना समजून घ्यायला हवे -हाफिज नदीम सिद्दीकी
बीड : जमीअत उलेमा-ए-हिंद भारत देशात वर्ष 1916 पासून सद्भावनेसाठी कार्य करत आले आहे. आणि या पुढेही कार्य करत राहणार आहे. भारत देशाचे तुकडे व्हावे हे जमियतला मान्य नव्हते. जमियत तेंव्हा भारतापासून पाकिस्तान विभाजन होऊ नये म्हणून जमीअत ने जोरदार विरोध केला होता याला इतिहास साक्षी आहे. मात्र, आज काही लोक असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत त्यामुळे आज आपल्या प्रत्येक माणसाने माणुसकी जपण्याची गरज आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमेकांना समजून घेतल्यास भारत देशात सुख शांती लाभेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांनी व्यक्त केला.
जमियत उलेमा-ए-हिंद च्या सदभावना मंचच्या वतीने जमीयत उलेमा-ए-हिंद च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांच्या सूचनेवरून व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 4) रोजी शहरातील बार्शी रोड वरील गोल्डन चॉइस हॉटेल सभागृहात सद्भावना सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी हाफिज नदीम सिद्दीकी बोलत होते. अगर भीड़ में खो गयी आदमियत, उसे धुंडने में जमाने लगे हैं हा शेर म्हटला तेंव्हा उपस्थित लोकांनी चांगली दाद दिली.
यावेळी मंचावर भिक्कु धम्मशील, फादर संजय लुथर गायकवाड, शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद, आमदार संदिप क्षीरसागर, माजी आ. ॲड. सिराजोद्दीन देशमुख, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. प्रा. सुनिल धांडे, सलीम जहाँगीर, जे. डी. शाह, शफीक हाश्मी, संपादक राजेंद्र होळकर, लोकपत्रकार भागवत तावरे, काजी जफर, जेष्ठ नेते मोईन मास्टर, फारूक पटेल, सलीम जहांगीर, बप्पासाहेब घुगे, शिवसंग्राम चे अध्यक्ष नारायण काशीद, शेख दस्तगीर अब्दुल (जमीयत युथ क्लब स्काऊट महाराष्ट्र प्रशिक्षण आयुक्त ), शेख अजीम दस्तगीर (जमीयत युथ क्लब स्काऊट महाराष्ट्र सचिव) स्काऊट , एम.बी. शेळके , डी.डी. बिलपे, व्ही. पी. सिरसट आदी उपस्थित होते.
सर्व प्रथम शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भारत देश स्वतंत्र झाला त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबरच स्वराज्य मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक होते. सर्व जाती धर्माचे मावळे होते. हिंदू -मुस्लिम असा भेद त्यांनी केला नाही तर अन्याय, अत्याचार विरोधात शिवाजी महाराजांची लढाई होती. असे सांगुन त्यांनी सध्याच्या काळात माणुसकी जपण्याचा संदेश दिला.
माणसाची एकच जात आहे ती म्हणजे माणुसकी असे विचार व्यक्त करीत भिक्कु धम्मशील यांनी म्हटले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले त्या संविधानाने आज आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलो आहोत. माणसात ही जात नसते तर जनावरात जात असते. यावेळी त्यांनी विविध उदाहरण देऊन माणुसकी हाच एक धर्म असल्याचे सांगितले. तर, फादर गायकवाड यांनी म्हटले की, आपण भारत देशात राहत असताना सर्वधर्मसमभावाने राहून आपल्या भारत देशाला उंच शिखरावर पोहचवता येईल. देशात सामाजिक एकता वृध्दींगत व्हावी यासाठी जमियत ने जो पुढाकार घेतला. अशा कार्यक्रमांची आज नितांत गरज आहे.
या कार्यक्र माचे आयोजन जमीयत उलेमा -ए- हिंद चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला साहेब कासमी, सचिव मौलाना साबेर साहब रशीदी, सद्भावना मंच चे अध्यक्ष मुजतबा अहेमद खान, काझी मुजीबुर्रहमान, हसीन अख्तर आदींनी केले होते. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन काझी मुजीबुर्रहमान यांनी केले तर शेवटी मुस्तफा खान यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.