नगरपालिकेच्या दयनीय अवस्थेला क्षीरसागरांचे राजकारण कारणीभूत – नवनाथ शिराळे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : क्षीरसागरांनी मनसोक्त पणे बीड नगरपालिकेची सत्ता भोगली. आता पायउतार झाल्यानंतर विकासाचे डोहाळे लागले आहेत. नगरपालिकेच्या दयनीय अवस्थेला क्षीरसागरांचे राजकारण आणि स्वार्थी कारभार कारणीभूत आहे. शहरातील विकासकामांसाठी क्षीरसागर सिओ, कलेक्टर यांना भेटून विकास समस्या मांडण्याचे थोतांड सुरु केले आहे. हा निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असून, क्षीरसागरांच्या भूल थापांना जनतेने थारा देऊ नये. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ शिराळे यांनी केले आहे.
आज शहरातील समाज मंदिर, चावडी, व्यायाम शाळा, वाचनालय यासारख्या सार्वजनिक इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. सत्ता ताब्यात असताना कोणत्या व्यायाम शाळेची आठवण यांना झाली नाही. मात्र तरुणांच्या मतावर डोळा ठेऊन, व्यायाम शाळेचे खोटे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली जात आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न आणि लोकांना अपेक्षित विकास याच्याशी क्षीरसागरांचे काहीही देणेघेणे नाही. बीडकरांची काळजी असती तर, शहराची भकास अवस्था झाली नसती. गणेशोत्सव, गौरीलक्ष्मी उत्सव, नागरिक कोरोनाच्या महामारी नंतर उत्साहात साजरे करत आहेत.
सण उत्सवात देखील शहरातील अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. पथदिव्याची मागणी झाली तर, नगरपरिषद प्रशासन कंपनी कडे बोट दाखवते. परंतू अंधारात चाचपडनाऱ्या नागरिकांना पथदिवे तातडीने लावण्याची हमी कोणी देत नाही. शहराची स्वच्छता, पिण्याचे पाणी देण्यास नगरपालिका कुचकामी ठरली. याची जाणीव ठेऊन बीडकरांनी सतर्क व्हावे.
आगामी काळात नगरपालिकेत परिवर्तन निश्चित असून, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप – सेनेची सत्ता स्थापित होणार आहे. परिवर्तना नंतर शहरातील विकास कामांना खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. वास्तव विकासाची नांदी सुरु करण्यासाठी बीडकरांनीही साथ द्यावी असे आवाहन नवनाथ शिराळे यांनी केले आहे.