गौरी आगमनाच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना, गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी परिसरात शोककळा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथे विजेच्या धक्क्याने आईसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हदयद्रावक घटना शनिवारी दुपारी राठोड वस्ती येथे घडली. महालक्ष्मी सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ललिता श्रीकांत राठोड (वय 30), प्रशांत श्रीकांत राठोड (11) आणि अभिजित श्रीकांत राठोड (8) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ललिता राठोड ह्या आपल्या दोन मुलांसह तांडा परिसरात असलेल्या शेतात गेल्या होत्या. दरम्यान खेळत असताना दोन्ही मुलांचा तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यांना जोरदाराचा विजेचा करंट लागला. दोन्ही मुले जमीनीवर कोसळ्याचे पाहुन ललिता राठोड या दोन्ही मुलांच्या मदतीसाठी धावल्या असता त्यांनाही जोरदार करंट लागला. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उशिरा कळाली तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. आज लक्ष्मीचा सण असुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती समजताच तलवाडा पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पंचनामा केला. मृतदेह तपासणीसाठी जवळच्या सरकारी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरचे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. गौरीच्या आगमनाच्या दिवशीच दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.