भूकंपासारखा हादरला संपूर्ण परिसर!
जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत
By MahaTimes ऑनलाइन |
नवी दिल्ली : नोएडामधील उंच ट्विन टॉवर अखेर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी हा टॉवर पाडण्यात आला आहे. 3600 किलो पेक्षा जास्त स्फोटकं वापरून ही इमारत काही सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली आहे. हा टॉवर पाडल्यानंतर आसपासचा संपूर्ण परिसर भूकंपासारखा हादरला. या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये धुळींचं साम्राज्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
पाडण्यात आलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त होती. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत आहे.
#WATCH | Once taller than Qutub Minar, Noida Supertech twin towers, reduced to rubble pic.twitter.com/vlTgt4D4a3
— ANI (@ANI) August 28, 2022
टॉवरमधील स्फोटकांचा स्फोट करण्यासाठी 100 मीटर अंतरावर नियंत्रण कक्षात एक स्विच करण्यात आलं होतं. याठिकाणी फक्त 6 लोक होते. याशिवाय 500 मीटरच्या परिघात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती. मीडियादेखील इमारतीपासून 600 मीटर अंतरावर राहाण्यास सांगण्यात आलं होतं
दरम्यान नोएडा परिसरात 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या. हे टॉवर कोसळताना घटनास्थळी एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही हजर होते.
नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रितू माहेश्वरी यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही टॉवरमधून सुमारे 60 हजार टन मलबा बाहेर आला आहे. याची विल्हेवाट लावण्यासाठी जवळपास 3 महिने लागणार आहेत.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक, अग्निपथक तैनात करण्यात आले आहे. एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुमारे 5 हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे.
टॉवर पाडण्याची तारीख 22 मे 2022 निश्चित करण्यात आली होती, परंतु तयारी पूर्ण झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना वेळ दिला. यानंतर 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान टॉवर तोडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यावेळीही टॉवर पाडण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेने प्राधिकरणाला पत्र देऊन ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत 28 तारखेपर्यंत तो पाडण्याची सूचना केली होती.