शाहेद पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला प्रश्न
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अतिवृष्टीने जमीन खरडून गेल्याने नुकसान झालेले आणि घरे पडल्याने नुकसान झालेले आहे.बीड तालुक्यातील नांदुर हवेली ,खामगांव ,पारगाव ज.,तादळवाडी हवेली,माळापुरी,आहेर चीचोली,कुर्ला ,भाटसागवी,व परिसरातील सुमारे ३०० शेतकरी दोन वर्षांपासून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची सुमारे ३० लाख रुपयांची मदत अद्याप त्यांना मिळालेली नाही. दरम्यान, पटेल फाऊंडेशनचे संस्थापक शाहेद पटेल ,दत्ता तीपाले ,गणेश बुधनर ,रीजवान पटान ,यांनी या प्रकरणी सोमवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली.
बीड तालुक्यातील सन २०२०-२१ मध्ये अतिवृष्टी झाली होती. अनेक गावात सिदंफना नदीला मोठा पूर आला होता. नांदुर हवेली, खामगाव, आहेर चिंचोली, कुर्ला ,तांदळवाडी हवेली, भाटसांगवी, कुर्ला, पारगाव जप्ती, पिंपळनेर, ताडसोन्ना या गावातील सुमारे ३०० शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी शिरल्याने जमीनी पुर्णत: खरडून गेल्या होत्या. शेतीचे व घराचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करुन या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. ही मदत देण्यासाठी क्रषीअधीकारी ,तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी गाव निहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन आणि त्यांच्या बँक खात्याचे क्रमांक घेऊन यादी तहसिल कार्यालयाला पाठवली होती. तहसिल कार्यालयानेही ही यादी वरिष्ठ कार्यालयाला पाठवली आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना एक रुपयांचीही मदत प्रशासनाने केलेली नाही. या प्रश्नावर पटेल फाऊंडेशनचे संस्थापक शाहेद पटेल यांनी आवाज उठवला असून शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तत्काळ त्यांच्या खात्यावर टाकण्याची मागणी केली आहे.
आमदारांकडून दखल
दरम्यान, शाहेद पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कृ़षी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संदीप क्षीरसागर यांना या प्रकरणी निवेदन दिले होते. आ. क्षीरसागर यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
कृषी मंत्र्यांनी लक्ष द्यावे
परिसरातील अनेक शेतकरी नुकसानग्रस्त आहेत. मदतीसाठी सातत्याने ते तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांना दोन वर्षांपासून मदत मिळालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांशी या प्रकरणी चर्चा केली आहे. कृषी मंत्री मराठवाड्यातील असून त्यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी
– शाहेद पटेल, अध्यक्ष, पटेल फाऊंडेशन, बीड