एकुरका गावात शोककळा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अशी माहिती की, केज तालुक्यातील एकुरका येथील नटराज रामहरी ( वय 33) यांची गाव परिसरात शेती आहे. काल सोमवारी मुलगा सोनू ऊर्फ रोहन (वय 13) शाळेतुन घरी आल्यानंतर त्यास घेऊन शेतात गेले होते. दरम्यान तहान लागल्याने रोहन माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील राजाभाऊ धस यांच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला. पाय घसरून तो विहिरीत पडून गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार निदर्शनास येताच नटराज यांनी विहिरीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहन याने त्यांच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीजवळ अन्य दुसरे कोणी नसल्यामुळे ते दोघे बापलेकाचा बुडून मृत्यू झाला.
दोघे बाप-लेक रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. शेतात जाऊन पाहिले असता विहिरीच्याकडेला चप्पल, चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आल्याने दोघे विहिरीत बुडाल्याचा संशय व्यक्त करीत विहिरीत गळ व बोराटी घालुन शोध घेतला. मात्र, तपास कांही लागला नाही. पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतला. मुरु ड येथून एका व्यक्तीला बोलावून त्याच्या मदतीने गळ सोडून दोघांचे मृतदेहवर काढले.
सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरघाट पोलीस चौकीचे कर्मचारी श्री. मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचानामा करूप प्रेत ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी नांदूरघाट येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. याप्रकरणी केज ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद झाला आहे.