शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीड शहरातील कॅनॉल रोड भागातील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
माजी आमदार विनायक मेटे यांचा पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव निवासस्थानी व त्यानंतर शिवसंग्राम भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा अंत्यसंस्कार स्थळाकडे मार्गस्थ झाली. साडेचार वाजता त्यांच्यावर जालना रोड येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. शेवटचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय या वेळी उपस्थित होता. यावेळी त्यांना पोलिसांकडूनही मानवंदना देण्यात आली. शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, मुलगा आशुतोष मेटे, मुलगी आकांक्षा मेटे यांची यावेळी उपस्थिती होती. मुलगा आशुतोष याने मुखअग्नी दिला. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील, तानाजी सावंत, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री राजेश टोपे, हरिभाऊ बागडे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री सुरेश नवले, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुरेश नवले, आ. संजय सिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. श्वेता महाले, आ. संजय दौड, आ. सुमनताई पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, मा. माजी खासदार चंद्रकात खैरे, माजी आमदार सदाभाऊ खोत, मा.आ. रविकांत तुपकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, पप्पू कागदे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मराठा आरक्षण राज्य समन्वयक विनोद पाटील, सुहास पाटील, मनोज जाधव इत्यादी उपस्थित होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात रविवारी विनायक मेटे यांचे निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित केली जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनायक मेटे यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नि देताच हजारो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. आपला लाडका नेता आपल्यात नाहीत या कल्पनेने अनेकांना हुंदका अनावर झाला. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. तर काहींनी हंबरडा फोडत आपला दुखावेग व्यक्त केला. यावेळी अमर रहे, अमर रहे, विनायक मेटे अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, मेटे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनीही पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. “मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता” असं ज्योती मेटे यांनी सांगितलं. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा महासंघाच्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले होते. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानपरिषदेचे सदस्य राहणारे ते राज्यातील एकमेव नेते होते.
यावेळी अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मराठा आरक्षण राज्य समन्वयक विनोद पाटील, रमेश आडसकर, रमेश पोकळे, सुहास पाटील, मनोज जाधव, विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी व नागरीक आलेले होते.