गुन्हेगारी नियंत्रणासह बीड पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हान
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीडचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले नंदकुमार ठाकूर यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. तत्कालीन एसपी आर. राजांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून हे पद रिक्त होते. गुन्हेगारी नियंत्रणासह बीड पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हान नूतन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासमोर आहे.

राज्याच्या गृहविभागाने बुधवारी सायंकाळी चार जेष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले, ज्यात नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची 8 जून रोजी बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. 9 जून रोजी दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून ठाकूर यांनी पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. पोलीस सेवेचा प्रदीर्घ अनुभव उपअधीक्षक ते पोलीस अधीक्षक असा त्यांचा पोलीस दलातील प्रवास आहे. आयपीएस दर्जा मिळालेले नंदकुमार ठाकूर हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील मनमाडचे असून त्यांना पोलीस सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची बदली झाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक पद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त होते. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून पोलीस अधीक्षक आर. राजा यांना 7 मार्च रोजी सक्तीच्या रजेवर जाण्याची नामुष्की ओढवली होती. अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी काही दिवस प्रभारी अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 1 मे रोजी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे धुरा सोपवली होती.

नांदेड वगळता मराठवाड्यात पहिल्यांदाच नियुक्ती झाली आहे. सहकायाकडून प्राथमिक माहिती घेत आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कुठल्या बाजू जमेच्या व कुठे कमतरता आहे. हे पाहणार आहे. जिल्ह्याचा अभ्यास झाल्यानंतर काम करण्याची दिशा स्पष्ट करता येईल.
-नंदकुमार ठाकूर,
पोलीस अधीक्षक, बीड
