पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या त्यांना जपा, गोपीनाथराव मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन साजरा
By MahaTimes ऑनलाइन | गोपीनाथगड, परळी वैजनाथ
लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणजे अविरत संघर्ष, साहस आणि वंचित घटकांची सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. मुंडे साहेबांच्या जनसेवेचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोपीनाथगडावर केले. ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा, मार्ग निघतोच असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गड येथे आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. या समारंभात विविध क्षेत्रातील वंचित, पिडित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘संघर्षदिन सन्मान’ म्हणून सम्मान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर, कविता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास श्रीमती प्रज्ञाताई मुंडे, आर्यमान पालवे, रासपचे महादेव जानकर, खा. सुजय विखे, भीमराव धोंडे, सुरेश धस, रत्नाकर गुट्टे, राजेश पवार, राधाताई सानप, आर टी देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, गोविंदराव केद्रे आदींसह अनेक नेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ज्ञानदेव काशीद यांनी केले तर प्रवीण घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, मी आज गोपीनाथ गडावर भाजपाचा नेता किंवा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर स्वर्गीय मुंडे यांचा भाऊ म्हणून उपस्थित आहे. भाजपाचे मजबूत संघटन आज देशभरात दिसून येते या संघटनाला महाराष्ट्राच्या गावागावांत पर्यंत पोहचवण्याचे कार्य स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी केले. मध्यप्रदेशमध्ये काम करताना सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनीच आपल्याला अध्यक्ष म्हणून पक्षात संधी दिली आणि मुंडे – महाजन यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अगदी जवळून मी या दोघांचेही काम पाहिलेले आहे. वंचित, उपेक्षित ,पिडीत घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी जीवनभर केले. गोरगरिबांना न्यायासाठी ते जेवढे प्रेमळ होते तेवढेच गुंडशाही झुंडशाहीच्या विरुद्ध वज्राप्रमाणे कठोर होते ते त्यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना दाखवून दिले आहे.
पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या त्यांना जपा
संघर्ष, साहस व सेवा हा त्रिवेणी संगम या लोकनेत्यामध्ये नक्कीच बघायला मिळतो. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊनच जनकल्याणाचे कार्य अविरत त्यांच्या मुली करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांना जपा, त्यांच्यामागे पाठबळ उभे करा, निश्चितच पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणेच जनसेवेचा वारसा पुढे चालू राहील असा विश्वास मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
उद्या काय मिळणार? याची मला चिंता नाही – पंकजाताई मुंडे
‘सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करु नका. उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. शिवराजसिंहांसारखे सात्विक लोक लाभले’. तुम्ही मध्यप्रदेशात जी किमया करुन दाखवली, जे इतर कोणत्याही राज्याला जमलं नाही. तुम्ही ओबीसी आरक्षण टिकून धरलं. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा लाभो. शिवराजसिंह चौहान यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ओबीसींची आरक्षण मिळवून द्यावं. राजकारणासाठी नाही तर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण हवं, असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या.