परभणीचे उपायुक्त पदावर झाली होती बदली, पदभार घेण्याआधीच कारवाईची नामुष्की ओढावली
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे अखेर निलंबित करण्यात आले आहे. बीड शहरातील विविध प्रश्नांसह अनियमिततेचा आरोप त्यांच्यावर होता. विधीमंडळाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या निलंबनाचे आदेश नगर परिषद विकास विभागाचे अवर सचिव यांनी जारी केले आहे.

डॉ. उत्कर्ष गुट्टे यांची नुकतीच परभणी मनपाचे उपायुक्त पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, पदभार घेण्याआधीच त्यांच्या हाती निलंबनाचे आदेश पडले आहे. मागील महिण्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधि मंडळात डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यासह पांच अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली होती. हा मुद्दा चांगलाच गाजला होता. दरम्यान नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चार अधिकाऱ्यांच निलंबित आणि डॉ. उत्कर्ष गुट्टे यांची विभागीय चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट सांगितल्याने सभागृहातील गदारोळ शांत झाला होता.
डॉ.गुट्टे हे नगरविकास मंत्र्याच्या परवानगी ने आपल्या खाजगी कामासाठी गेल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी इतर अधिकाऱ्यांना चर्चेसाठी थांबून माहिती दिली नाही व विधीमंडळाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या निलंबाचे आदेश अवर सचिवांनी काढले आहे.

नगरविकास विभागाचा असा कसा कारोबार
बीडचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागानेच काढले होते. प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने त्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली होती.
नगर विकास विभागास जर, डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करायची होती तर, आधी बदली आणि त्यानंतर पदभार घेण्याआधीच निलंबनाचे आदेश काढून एका बड्या अधिकाऱ्याला अपमानित केले आहे. कोणाच्या दबावाखाली येउन ही कार्यवाही करण्यात आली. असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. या अन्यायाविरूध्द डॉ. उत्कर्ष गुट्टे न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते. मात्र, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होउ शकली नाही.
