काल निवडून आलेले काहीजण, मालका प्रमाणे वागू लागले – जयदत्त क्षीरसागर
By MahaTimes ऑनलाइन | बीड
उतारवयात ज्यांच्या मनाला शांतीची गरज असते. पेन्शनर पार्क हे एक आदर्श काम आहे. मुक्त भावना व्यक्त करण्यासाठी पेन्शनर पार्कची उभारणी खूप उपयोगी ठरणार आहे. सामुदायिक स्वरूपाची कामे पूर्ण केली जात आहेत. चांगल्या कामाची स्पर्धा असायला हवी लोकांनी सेवक म्हणून निवडून दिले आहे. काल निवडून आल्यानंतर काहीजण मालका प्रमाणे वागू लागले आहेत. अडीच वर्षांपूर्वी काय चित्र होते आणि आज काय आहे. याचे मूल्यांकन झाले पाहिजे. असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

मराठवाड्यातील पहिले पेन्शनर पार्क तसेच पहिला सेल्फी पॉइंट बीड शहरातील के.एस.के.महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आला आहे. या भागाचे नगरसेवक विनोद मुळुक, नरसिंह नाईकवाडे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या पार्कचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.विवेकानंद सानप हे होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, शेख फईम, दिनकर कदम, विलास बडगे, अरुण डाके, गणपत डोईफोडे, तानाजी कदम, सखाराम मस्के, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, शहराध्यक्ष सुनिल सुरवसे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, प्रभाग क्रमांक 23 मध्ये मामा, भाच्याने कायापालट करून दाखवला आहे. तरुण नगरसेवक विनोद मुळूक आणि नरसिंग नाईकवाडे या दोघांच्या प्रयत्नांमुळे सर्वाधिक निधी या प्रभागाला मिळाला आहे. आमदनी अठन्नी व खर्चा रुपया अशी अवस्था बीड नगरपालिकेची आहे. असे असताना आम्ही दिलेला शब्द पाळण्याकरता सत्ता कुणाचीही असो राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेतला आहे. येत्या काही दिवसातच बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत आहे थोडी कळ सोसा तोही प्रश्न सुटणार आहे.
प्रत्येक प्रभागात समान निधी वाटप करून कामे- डॉ. योगेश क्षीरसागर

यावेळी बीड शहरातील विविध कामांच्या बाबतीत बोलताना युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, शहरातील प्रत्येक प्रभागात येत्या काळात समान निधी वाटप करून कामे केली जाणार आहेत. शहराचा विकास करत असताना कुठे कमी-जास्त नव्हे तर आधीक कामे केली आहेत त्याच बरोबर दहा हजार वृक्षांची लागवड झाल्यामुळे हरित बीडची संकल्पना पूर्ण होत आहे. अनेक शहरात वृक्षारोपण झाले मात्र त्याचे संगोपन न झाल्यामुळे शहरे उजाड दिसू लागले आहेत. बीडकरांनी वृक्ष संगोपन करून मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे ते म्हणाले.
विकास कामासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार -जगताप
अनिल जगताप म्हणाले की, बीड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असून विकासाच्या आड येणार्याला आडवे करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. वास्तविक पाहता अल्प उत्पन्न असणार्या बीड नगरपालिकेत विकास कामे होणे शक्य नव्हते मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शासन स्तरावर मोठे प्रयत्न करून कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला आहे. ही कामे झाली किंवा होत आहेत ती केवळ यांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात विवेकानंद सानप म्हणाले की, जिथे जिथे लोकांची मागणी येते तिथे स्वतः लक्ष देऊन अण्णा कामे करून घेत असतात वृध्दांना दिलासा देणारे काम आज झाले आहे. त्यांची मानसिकता आणि त्यांचा आनंद खूप महत्त्वाचा आहे. वृद्धापकाळात मनाला समाधान मिळणारे ठिकाण म्हणून या पार्कचे नाव घेतले जाईल असे ते म्हणाले.
यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक डॉ.वासुदेव निलंगेकर यांनी मनोगत व्यक्त करून विनोद मुळूक यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मुळूक यांनी तर, सूत्रसंचालन ज्ञानदेव काशिद यांनी केले.
यावेळी गटनेते सादेक जमा, नगरसेवक गणेश वाघमारे, जगदीश गुरखुदे, विलास विधाते, किशोर पिंगळे, भैय्यासाहेब मोरे, रंजित बनसोडे, सय्यद इलियास, विकास जोगदंड, शुभम धुत, राणा चौव्हान यांच्यासह सर्व सहकारी व या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
