By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांची परभणी महानगर पालिकेचे उपायुक्त म्हणुन बदली झाली आहे. त्यांच्याजागी नांदेड – वाघाळा महानगर पालिकेचे उपायुक्त उमेश ढाकणे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज पदभारही स्विकारला आहे.

बीडचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या बदलीचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने त्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. डॉ. गुट्टे यांच्यावर परभणी महानगर पालिकेचे उपायुक्त म्हणुन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. गुट्टे यांनी पालिका प्रशासन चालवितांना चांगले काम केले.
मात्र, कोरोना संकट काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भाजीपाला नाल्यात फेकून देणारे आणि नियमांच्या
नावाखाली एका औषधी विक्रेत्यास दुकानात जावून काठीने मारहाण केल्याने त्यांच्या कारर्कीदीला अशी वादाची किनार लागली होती. दरम्यान राज्य शासनाने 27 मे रोजी मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
व पदस्थापना दिल्या असून यात डॉ. उत्कर्ष गुट्टे यांची परभणी महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी पदस्थापना देण्यात
आली आहे. गुट्टे यांना 27 मे रोजी बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे
राज्य शासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी म्हटले आहे.

दरम्यान आता बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नांदेड – वाघाळा महानगर पालिकेचे उपायुक्त उमेश ढाकणे . यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभारही स्विकारला आहे. उमेश ढाकणे यानी यापूर्वी गेवराई नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणुन पदभार सांभाळलेला आहे. शिस्तप्रिय आणि डॅशिंग अधिकारी म्हणुन ढाकणे यांची ओळख आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचनेवरून सुरू असलेले आरोप – प्रत्यारोप, न्यायालयीन क्रिया आणि शहरातील स्वच्छतेसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून होणाऱ्या तक्रारी हे नव्या मुख्याधिकाऱ्यांसाठी आव्हान असणार आहे.
