शिरूर तालुक्यातील भानकवाडी शिवारात घडली घटना ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
By MahaTimes ऑनलाइन | बीड
शिकाऱ्याने लावलेल्या वाघूरीत (जाळ्यात) अडकल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारी 4 च्या सुमारास शिरूर कासार तालुक्यातील भानकवाडी दोरखडा शेत शिवारात घडली. बिबट्याच्या मृत्यूमुळे वनक्षेत्रात वन्यजिवांची शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भानकवाडी येथील दोरखडा शेत शिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरताच सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे व वनरक्षक बद्रीनाथ परजने, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, डॉ अशोक गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे यांना बिबट्या जाळ्यात अडकल्याची मिहती दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाघूरीत ( जाळ्यात अडकलेल्या बिबट्याचा व जागेची पहाणी आणि पंचनामा केला. त्या नंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोरघरे मॅडम, डॉ. आघाव, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे यांना बोलावून घेत जागेवरच इन कॅमेरा बिबट्याचे शवविच्छेदन केले. विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यावर पिपळवंडी ता.पाटोदा. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 9 प्रमाणे वनरक्षक बद्रीनाथ परजणे यांचे फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व साधू धसे हे करत आहेत.