मयत लातूर जिल्ह्यातील रहिवाशी ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव जवळ खडी केंद्राजवळ ट्रक आणि क्रूजर जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर अन्य दहा जण गंभीर जखमी झाले. तिघांची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात शनिवारी (दि. 23) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. मयत लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मृतांमध्ये महिला, बालक व जीप चालकाचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील एक कुटुंबातील कांही सदस्य क्रूजर जीपमधून (एमएच 24 व्ही- 8061) मावंद्याच्या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील उत्तमराव गंगणे यांच्याकडे जात होते. सायगावजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (आरजे 11 जीए-9210 ) सोबत समोरासमोर धडक बसली. या ट्रक आणि जीपचा भीषण अपघातात जीप मधील सात जण जागीच गतप्राण झाले. अपघातातील मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (38), स्वाती बोडके (35), शकुंतला सोमवंशी (38), सोजरबाई कदम (37), चित्रा शिंदे (35), खंडू रोहिले (35, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. मृतांमध्ये महिला, बालक व जीप चालकाचा समावेश आहे.
तर, राजमती सोमवंशी (50), सोनाली सोमवंशी (25), रंजना माने (35), परिमला सोमवंशी (70), दत्तात्रय पवार (40), शिवाजी पवार (45), यश बोडके (9), श्रुतिका पवार (6), गुलाबराव सोमवंशी (50) आण िकमल जाधव (30) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात येवढा भीषण होता की जीपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल झाला. अपघाताची माहिती समजताच लातुर व राडी (अंबाजोगाई) येथील नातेवाईकांनी रूग्णालयाकडे धाव घेतली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिण्यात याच ठिकाणी ट्रक व बसचा भीषण अपघात झाला होता. यात सहा जण ठार झाले होते. सदरचा हा अपघात पॉईंट झाल्याने अन्य लोकांचा बळी जाऊ नये म्हणून येथे कांही उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.