बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यस्तरीय विशेष पुरस्कार २०१९-२२ साठी बीड जिल्ह्यातून हसीन अख़्तर व रेश्मा परवीन यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती उर्दू अकॅडमी चे कार्यकारी अधीक्षक शोएब हाशमी यांनी कळविली आहे.
उर्दू अकॅडमीच्या कमिटीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने हे पुरस्कार जाहीर केले. असून लवकरच मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी हसीन अख़्तर व रेश्मा परवीन यांची निवड झाल्याने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हसीन अख़्तर हे उर्दू भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी नेहमी अग्रेसर असतात. वेगवेगळ्या विषयांवर उर्दू भाषेतून सातत्याने लिखाण करतात. उर्दू शायरी, उर्दू मुशायरा यातही आवर्जून सहभागी असतात. एक शायर व लेखक म्हणून आजपर्यंत त्यांचे बरेच साहित्य वाचकांसमोर आलेले आहेत. आणि फक्त उर्दू भाषा ज्ञात असणारेच नाही तर इतर भाषेतील वाचकही त्यांच्या लिखाणाचे चाहते आहेत.सामाजिक कार्यात सुद्धा ते कार्यरत आहेत. समाजातील तळागाळातल्या गोरगरिबांना आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याकडे नेहमी त्यांचा कल असतो. अलीकडच्या काळात बीड शहरातील विविध चौकांमध्ये त्या-त्या परिसरातील भागांची नावे लिहिलेल्या उर्दू भाषेतील पाट्या त्यांनी लावल्या आहेत. त्यांच्या या पाट्यांमुळे उर्दू वाचणाऱ्यांना चौकातील विविध भागांची नावे मोठ्या सहजतेने माहित होत आहेत. अशाप्रकारे त्यांचे चौफेर कार्य सुरू आहे.
रेश्मा परवीन बख़त्यारोद्दीन या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरब गल्ली, पाटोदा येथे सहशिक्षिका पदावर कर्तव्यरत आहे. त्यांनीही एक शिक्षिका म्हणून आतापर्यंत शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याकरिता त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा खाजगी संस्थांच्या शाळांसारखे शिक्षणाव्यतिरिक्त इतर सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. यामुळे त्यांची विद्यार्थ्यांसाठी झटून काम करणाऱ्या शिक्षिका म्हणून ओळख आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांची आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हसीन अख़्तर आणि रेश्मा परवीन या दोघांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमीच्या वतीने मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे उर्दू क्षेत्रासह सर्व स्तरातून स्वागत होत आहे.