बारामतीत आयोजित होमिओपॅथिक चर्चासत्रामध्ये 175 डॉक्टरांचा सहभाग
By MahaTimes ऑनलाइन – बारामती |
होमिओपॅथी शास्त्र हे लोकाश्रयावर टिकून असून राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही. राजाश्रयासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मधील अडथळा लवकरच दूर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रिय होमिओपॅथीक परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांनी केले.
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन यांच्या 267 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व हार्मोनी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अँड रिसर्च सेंटर,बारामती, हॅनीमनियन होमिओपॅथिक फोरम, बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ एप्रिल रोजी भिकोबा तांबे सभागृह,बारामती येथे आयोजित होमिओपॅथी चर्चासत्राच्या व हार्मोणी होमिओपॅथिक क्लिनिकच्या उद्घाटनपर भाषणात केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ.सोमनाथ गोसावी (प्रशासक महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई), डॉ. बाळकृष्ण गायकवाड (प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र होमिओपॅथीक परिषद मुंबई), डॉ. प्रतिक तांबे (प्रशासकीय सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी), मुंबईचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. श्रीकृष्ण डाफळे, डॉ.अलोक कुमार,पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पवार, कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्याम प्रसाद पावशे, सचिव डॉ. श्रीकांत लंगडे, बारामती
तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. विशाल गायकवाड इ.उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. अरुण भस्मे यांनी राजाश्रयासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू असून याला राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगाव येथे सुरू करून व महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकमेव होमिओपॅथिक हॉस्पिटलसाठी एमपीएससीच्या वतीने मुलाखती घेऊन शासकीय वैद्यकीय अधिकारी हे पद सुध्दा भरण्यासाठी डॉ.स्वानंद सोनार यांची शिफारस केल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीतजी देशमुख यांनी होमिओपॅथी शास्त्राला राजाश्रयासाठी पहिले पाऊल टाकल्याचे दिसत असून होमिओपॅथिक डॉक्टरांना शासकीय सेवेत नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आयुष संचालनालयाला यासाठी येणारे खर्चाचे बजेट शासनास त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले असून येत्या काळामध्ये सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये होमिओपॅथिक बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार असून यासाठी होमिओपॅथीक डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे, यामध्ये जवळजवळ चौदाशे पन्नास होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश होऊ शकतो असे सांगितले.
प्रास्ताविकात डॉ.ज्ञानेश्वर पवार होमिओपॅथीच्या प्रचार व प्रसारासाठी आम्ही बारामती येथील होमिओपॅथिक डॉक्टरांनी एकत्र येत हर्मिणी मल्टी स्पेशालिटी ओपीडी सुरू केली असून शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या उपचाराने रुग्णावर उपचार करणार असून यामध्ये अतिदुर्धर आजार, महिलांच्या समस्या, केसांच्या समस्या, त्वचेच्या तक्रारी, सर्व प्रकारच्या अॅलर्जी, मानसिक आजार, मुतखडा, मूळव्याध, जठराचे विकार, कॅन्सरसह समुपदेशन इ.वर उपचार करणार असल्याचे सांगत गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन, कै.डॉ.मिलिंद राव, कै.डॉ. मोहंती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी यांनी होमिओपॅथिक शास्त्राच्या प्रगतीसाठी शासन स्तरावर आम्ही प्रयत्न करत असून यामध्ये आम्हाला चांगले यश येईल यासाठी सर्वांनी एकत्रित असणे गरजेचे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेने आजवर केलेल्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी मुंबईचे प्रसिद्ध वक्ते डॉ.श्रीकृष्ण डाफळे व डॉ. अलोक कुमार यांनी होमिओपॅथी शास्त्र जगाला समजावे यासाठी कै. डॉ. मिलिंद राव यांनी अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने होमिओपॅथी कशी करता येईल व चांगले होमिओपॅथी डॉक्टर कसे घडवले जातील यासाठी प्रयत्न केले. आम्ही त्यांचाच वारसा पुढे चालवत असून होमिओपॅथी शिक्षण घेतलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करावी असे आवाहन केले. पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे यांनी डॉक्टरांनी सेवाभाव जपत रुग्णांना केंद्रबिंदू ठेवून कार्यरत राहणे गरजेचे असून चर्चासत्राच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगत डॉक्टरांनी आपली नीतिमूल्ये जपत समाजामध्ये आदर्श निर्माण करावा असे सांगितले. सदर चर्चासत्रामध्ये 175 होमिओपॅथिक डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रकांत पिल्ले यांनी केले तर आभार डॉ मनोज अभंग यांनी मानले.