बांबूचा देशातील पहिला प्रयोग परळी थर्मलमध्ये केला जाणार
पाशा पटेल यांना बांबू पुरवण्याचे एक हजाराहून अधिक कोटी रूपयांचे कंत्राट !
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
कार्बन उत्सर्जन वाढल्यामुळे तापनात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम ऋतुचक्रावर झाला आहे. पुर्वी 27 नक्षत्र होते, आता ढगफुटी आणि दुष्काळ हे दोनच नक्षत्र राहीले आहेत. यामुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. या परिस्थितीत जीवसृष्टीचा विनाश थांबवून पृथ्वीचा विनाश थांबवण्यासाठी बांबू लागवडीशिवाय पर्याय नाही. शेतकर्यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन ऊसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणार्या बांबू लागवडीची चळवळ उभी करावी. काळाची गरज म्हणून शेतकर्यांनी आता उर्जा उत्पादक बनावे, असे प्रतिपादन राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.11) बांबू लागवडीतील संधी व मुल्यवर्धन मार्केटींग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार पाशा पटेल, बांबू तज्ञ संजीव करपे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संतोष मानुरकर, रमेश पोकळे, संतोष हांगे, लोढा, गंगणे, तहसिलदार बनकर, अमोल भीलारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले, जगात बांबूच्या 1600 जाती आहेत. परंतू इंग्रजांनी भारतात ‘कटांग’ नावाची काटेरी जात सर्वत्र लावल्यामुळे लोकांच्या मनात बांबू विषयी गैरसमज पसरलेला आहे. ऊसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणार्या आणि कपड्यापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल- बुटापासून ईथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणार्या बांबूच्या जाती आहेत. सध्या भारतात देखील बांबूपासून सध्या 1700 प्रकारच्या वस्तू बनवल्या जात असल्याचे त्यांनी सांगीतले.
पृथ्वी आणि जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर
पृथ्वीचे प्रचंड तापमान वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले आहे. ऋतु चक्राचा ताळमेळ राहीलेला नाही. पृथ्वीवरचे हीम नग वितळत आहेत. आयपीसीसी च्या रिपोर्ट नुसार भारतातील बारा शहरे पाण्याखाली जाणार आहेत. श्रीलंका, इंडोनेशीया, मलेशिया या देशांसोबत 2 हजार 200 आयलँड समुद्र गिळू टाकणार आहे. एकंदरीत पृथ्वी आणि जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. तिला वाचवण्यासाठी पृथ्वीचे तापमान 2 डीग्रीने कमी करावे लागणार आहे. यासाठी दगडी कोळशावर चालणारे जगभरातील प्रकल्प बंद करावे लागतील. यावेळी वीजनिर्मितीसाठी बांबू शिवाय दुसरा पर्याय नाही.
महत्वाचे म्हणजे कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी पेट्रोल- डीझेलचा वापरही बंद केला जाणार आहे. बांबूपासून इर्थनॉल तयार करून तेच वाहणाचे इंधन म्हणून वापरले जाणार आहे. बांबूपासून ईंधन निर्मितीचा पहिला प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या परिस्थितीत विविध प्रकल्प आणि हजारो वस्तू तयार करण्यासाठी करोडो मेट्रीक टन बांबू लागणार आहे. असे पाशा पटेल म्हणाले. यंत्राचा शोध लागण्यापुर्वी हवेतील कार्बनचे प्रमाण 280 पीपीएम एवढे होते. ते आज 422 ईतके झाले आहे. आणखी 28 ने वाढून ते जेव्हा 450 होईल तेव्हा पृथ्वीचा विनाश होईल. हा विनाश थांबवण्यासाठी पृथ्वीचे तापमान 2 डीग्रीने कमी करावे लागेल. बांबू लागवडीतूनच ते शक्य असल्याचे पाशा पटेल म्हणाले.
बांबूचा देशातील पहिला प्रयोग परळी थर्मलमध्ये
सर्वाधिक कार्बनचे उत्सर्जन कोळशावर चालणार्या वीज निर्मिती प्रकल्पातून होते. कारण हजारो प्रकल्पात रोज लाखो मेट्रीक टन कोळसा जाळला जातो. यातून रोज 5 लाख मेट्रीक टन कार्बनडाय ऑक्साईड हवेत जात आहे. कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी जगभरातील दगडी कोळशावर चालणारे सर्व वीज प्रकल्प बंद करावे लागणार आहेत. या परिस्थितीत कोळशाला पर्याय म्हणून बांबू जाळून वीज निमिर्ती केली जाणार आहे. याचा पहिला प्रयोग परळी थर्मलमध्ये केला जाणार असल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली. बांबू पुरवण्याचे एक हजाराहून अधिक कोटी रूपयांचे कंत्राट पाशा पटेल यांना मिळाले असून ते 6 हजार 500 रूपये प्रती टन दराने प्रत्येक महिन्याला 7 हजार टन बांबूचा पुरवठा करणार आहेत. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास तीन महिन्यानंतर 24 थर्मलमध्ये कोळशाचा वापर बंद करून बांबू जाळून वीज निर्माण केली जाणार आहे.
कार्यशाळेचे सुत्रसंचलन पत्रकार संतोष मानुरकर यांनी केले. कार्यशाळेस प्रतिष्ठित आणि अधुनिक शेती करणार्या शेतकर्यांची लक्षणीय उपस्थिती होती.