रमाई आवास योजना : परळीतील 170 लाभार्थींना 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे हस्ते वितरण
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
परळी नगर परिषदेच्या माध्यमातून रमाई आवास घरकुल योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार असून, एकही पात्र लाभार्थीं घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या 170 लाभार्थींना 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज परळीतील जगमित्र कार्यालयात वितरण करण्यात आले.
सन 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 423 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यांपैकी 170 लाभार्थींना आज झालेल्या कार्यक्रमात पहिल्या हफत्याचे वितरण करण्यात आले तर उर्वरित घरकुलांच्या पहिल्या हफत्याची रक्कमही लवकरच राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, गटनेते अजयजी मुंडे, डॉ. मधुकर आघाव, न.प. चे मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांसह आदी उपस्थित होते.