मयत व आरोपी दोन्ही पश्चिम बंगाल राज्यातील रहिवाशी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
दारूच्या नशेत दोन मजुरात किरकोळ वाद झाला. दरम्यान नाकावर ठोसा मारल्याने रक्तबंबाळ झालेल्या युवकाने आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ढेकणमोहा (ता. बीड) येथे घडली.
बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे रेल्वे मार्गाचे काम सुरू असून याचे टेंडर पश्चिम बंगाल येथील सुशांत सुनिल मंडल यास मिळालेले आहे. पश्चिम बंगाल राज्यातील 11 मजदूर कामाच्या ठिकाणी शेड मध्ये सध्या वास्तव्यास आहेत. काल शुक्रवारी, 25 मार्च रोजी रात्री मयत हैदरअली तरफदार पिता अब्दुल हुसैन (48 रा. कलापूर ता. दतपुलिया जिल्हा. नादिया) व सिमूल बिस्वास पिता निपेंद्रनाथ बिस्वास (30, रा. नारायणपूर, कटलबागल, ता. दतपुलिया जिल्हा. नादिया) या दोघांत वाद निर्माण झाला.
दरम्यान हैदरअली याने सिमूल बिस्वास च्या नाकावर ठोसा मारल्याने त्याच्या नाकातून रक्त आले. याचा राग मनात धरून सिमूल बिस्वास पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गाढ झोपीत असलेल्या हैदरअली च्या डोक्यात घातले यात तो जबर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला.
सदर घटनेची माहिती समजताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस उपनिरीक्षक श्री. ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक खरात, एएसआय आत्माराम गर्जे, जमादार बी.टी.खरमाटे, कडुळे, सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी आरोपी सिमूल बिस्वास विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.