पती, दीर व जाऊविरुद्ध गुन्हा दाखल, सासरच्यांनी ढकलून देऊन जीवे मारल्याचा आरोप
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एका नव विवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरातील शाहूनगर भागात उघडकीस आली. यासमीन शकूर शेख (21, रा. शाहूनगर, बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही आत्महत्या नसुन सासरच्या लोकांनी मुलीचा जाच करून तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन जिवे मारल्याचा आरोप मयत यासमीन चे वडील रहीम शेख यांनी केला आहे. यावरून महिलेचा पती, दीर व जाऊविरु द्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
बीड शहरातील इस्लामपुरा भागातील रहीम शरीफोद्दिन शेख यांची मुलगी यासमीन हिचा विवाह 26 ऑक्टोबर 2021 रोजी शकूर बशीर शेख (29, रा. शाहूनगर,बीड) याच्याशी झाला होता. शकूर हा मिस्त्री काम करून आपला उदनिर्वाह करतो. आज गुरूवारी सकाळी यासमीन शकूर शेख हिचा सासरच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.
त्यांनी तक्रारित म्हटले आहे कि, लग्न होऊन जेमतेम एक महीना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. आज गुरूवारी (दि. 24) सकाळी 7 वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. मात्र, मयत यासमीन चे वडील रहीम शेख यांनी हा अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार स्वीकारण्यास तयार नाही. सासरच्या लोकांनी तिचा छळ करून तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन ठार मारल्याचा त्यांचा आरोप आहे.
या आरोपावरून महिलेचा पती शकूर बशीर शेख, दीर नसीर बशीर शेख, जाऊ सोफिया नसीर शेख या तिघांविरु द्ध शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे हे करीत आहेत.
पती ताब्यात, नातेवाईकांची गर्दी
सदर घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संतोष वाळके,शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक बाळराजे दराडे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रु ग्णालयात पाठविला. पती शेख शकूर यास ताब्यात घेतले आहे. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयासह पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.