यंदाचे मानकरी ठरले अमृत देशमुख, कपड्यांचा आहेरसह यंदा सोन्याची अंगठी दिली भेट
केज तालुक्यातील वीडा गावात अनोखी प्रथा अव्याहतपणे सुरू
By MahaTimes ऑनलाइन – बीड | फेरोज अहेमद
सासुरवाडी म्हटले की जावयाचा मान-सम्मान आलाच. सासरी आलेल्या जावयाचे मन दुखावु नये म्हणून बरीच काळजी घेतली जाते मात्र, बीड जिल्ह्यातील वीडा (ता. केज) गावात गेली नव्वद वर्षांपासुन अनोखी प्रथा अव्याहतपणे सुरू आहे. कोविड-19 महामारी चे संक्रमण व लॉकडाउनमुळे ही प्रथा खंडित झाली होती. मात्र यंदा कोरोनाची तिसरी लहर शांत झाल्याने विडेकरांनी जोमात धुळवड साजरी करण्याबरोबर आपली प्रथा कायम ठेवली. यंदा गर्दभसवारीचे मानकरी अमृत देशमुख हे ठरले. या अनोख्या प्रथेला भाग बनलेले जावई सोलापुर जिल्ह्यातील रातंजन (ता. वैराग) येथील रहिवाशी आहेत. ते केज येथील वसुंधरा अर्बन बँकेचे कर्मचारी आहेत.
धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी मेहुण्यांसह सरंपच सुरज पटाईत, तुकाराम पटाईत, चिंतामन काळे, डॉ. उदय पवार, दीपक वाघमारे, अजय पटाईत, अशफाक शेख आदींनी त्यांना जाळ्यात ओढले. शुक्रवारी (दि. 18) सकाळी दहा वाजता सुरू झालेली मिरवणुक दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संपली. यानंतर ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या पारावर मिरवणूक विसर्जित करून जावयास कपड्यांचा आहेर व सोन्याची अंगठी देउन सन्मान करण्यात आला.
जावईबापूंची गाढवांवरून मिरवणूक कशी चालते ते पाहण्यासाठी आजुबाजूच्या गावातील लोक आवर्जून उपस्थित होते. एकिकडे जावयाची गदर्भसवारी असे चित्र असले तरी दुसरीकडे या परंपरेतून सामाजिक एकोपा व सलोख्याचेही दर्शन घडले.
अशी आहे प्रथा
संस्कृतीवैविध्याने नटलेल्या या देशात, राज्यात वार्षिक सण-उत्सव विविधांगी साजरे करण्याची मोठी परंपरा आहे. केज तालुक्यातील वीडा या गावचा धुळवडीचा सण असाच वैशिष्टयपूर्ण साजरा केला जातो. 90 वर्षांपूर्वी तत्कालीन ठाकूर अनंदराव देशमुख यांनी जावयाला थट्टा मस्करीने होळीच्या दिवशी गाढवावर बसवून ही मिरवणूक गावभर काढली होती. गेले नव्वद वर्षांहून अव्याहतपणे जावयांची गाढवांवरून मिरवणूक निघत असल्याने आपली फजिती नको, म्हणून जावईबापू या मिरवणुकीला टाळण्यासाठी लपून बसतात. मात्र वीडा चे गावकरी होळीचा सण जसजसा जवळ येईल तसे जावयांना पकडण्यासाठी ग्रामस्थांची काही पथके त्यांच्या मागावर निघतात. माहिती मिळवून जावईबापूंना पकडण्याची मोहीम फत्ते करतात.