जि.प.अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा विविध कारणांनी अनेकदा लांबणीवर पडला. अखेर या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त ठरला आहे. पूर्वी घेतलेल्या ठरावाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे तसेच ठरल्याप्रमाणे इतर सर्वच पुतळ्यांच्या कामांचे भूमिपूजन करूनच जिल्हा परिषद इमारतीचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.19) संपन्न होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई शिवाजीराव सिरसाट व उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळे तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. सुंदरराव सोळंके यांचे पुतळे उभारण्याची घोषणा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव संमत केला होता, त्यानुसारराज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री धनंजय मुंडे हे असणार आहेत.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, खा. रजनीताई पाटील, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. संजयभाऊ दौंड, आ. विनायक मेटे, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता ताई मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मा. आ. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, कृषी सभापती सौ. सविताताई मस्के, महिला व बालकल्याण सभापती सौ. यशोदाताई जाधव, समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, अनिलदादा जगताप, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांसह आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक १ चे प्रभारी कार्यकारी अभियंता पोपटराव जोगदंड यांनी केले आहे.
Advt.