आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरेल – धनंजय मुंडे
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकत आहे. नगर पंचायत निवडणुकीत काय झाले याचा अधिक काळ विचार करत बसण्यापेक्षा एकत्र येऊन कामाला लागल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक क्रमांकाचा पक्ष होईल, इतकी ताकत व जनतेच्या मनात पक्षाप्रति विश्वास निर्माण व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे लागेल असे मत सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी आज जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांना फेटा बांधून धनंजय मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी व आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राजेश्वर चव्हाण हे पक्षाच्या स्थापनेपासूनचे सदस्य असून, त्यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याचबरोबर मजबूत संघटना बांधणी व नम्रपणा हा गुण त्यांच्या अंगी असून त्यांच्या नेतृत्वात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात घवघवीत यश मिळेल व श्री चव्हाण पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करतील असेही धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी आ. संजय दौंड, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट,मा.आ. अमरसिंह पंडित, मा. आ. सय्यद सलीम, विजयसिंह पंडित, मा. आ. पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, ऍड. बागल, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, यासह राष्ट्रवादीच्या विविध आघाडीचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्याचा दौरा करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण सुरुवात करणार असून, कुठेही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा शब्द यावेळी रा. कॉ. चे अध्यक्ष ऍड. चव्हाण यांनी दिला.