संकल्प मार्गी : आमदार संदीप क्षीरसागरांनी शब्द पाळला
नवीन भाजी मंडईसाठी ३ कोटी तर, डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील मंडईसाठी २ कोटी इतका निधी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शहरातील नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक वातावरणातील निरोगी भाजीपाला मिळवून देण्याचा आ.संदीप क्षीरसागर यांचा संकल्प मार्गी लागला आहे. आ.क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून नगर विकास विशेष निधीअंतर्गत ५ कोटींचा निधी भाजी मंडईच्या विकासासाठी मंजूर करून आणला असून लवकरच भाजी मंडईचे नुतणीकरण, आधुनिकीकरण होऊन सुसज्ज होणार आहे.
शहरात नवीन भाजी मंडई संस्कार विद्यालय परिसर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या दोन ठिकाणी मुख्यतः बाजार भरतो. भाजी विक्रीसाठी तालुक्यातून दररोज शेतकरी आणि व्यापारी येतात परंतू नव्या भाजी मंडईत नगरपरिषदेने बांधलेल्या ओट्यांची दुरावस्था सध्या उकंड्यासारखी झाली आहे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी मंडईत कसल्याही प्रकारची सुविधा नसल्याने विक्रेते थेट आपली दुकाने रस्त्यावरच मांडतात.
नागरिकांच्या या समस्या जाणून घेत आ.संदीप क्षीरसागर, भाजी मंडईच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे बऱ्याच दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते, शेवटी शुक्रवारी (दि.११) रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मंडईच्या विकासकामांचा प्रस्ताव मंजूर करून विशेष निधीअंतर्गत ५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश आले.
या निधीअंतर्गत महात्मा फुले नवीन भाजी मंडई नुतनीकरणासाठी ३ कोटी तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी मंडईसाठी २ कोटी इतका निधी खर्च केला जाणार असून बीड शहरातील दोन्ही भाजी मंडई घाणीचा विळखा तोडून लवकरच मोठ्या शहरांप्रमाणे आधुनिक होणार आहे. बाजारात ग्राहकांना भाजीपाला स्वच्छ व निर्जंतुक मिळण्यासाठी नियोजन केले जाणार असून लवकरच भाजी मंडई सुसज्ज होणार आहेत.